गोवा

मडगावची ६० टक्के न्यायालये कार्यरत नाहीत : प्रभव

मडगाव : दक्षिण गोव्यात, विशेषतः मडगाव येथे निर्माण झालेल्या न्याय व्यवस्थेतील गंभीर संकटाबाबत ‘मडगावचो आवाज’ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दहा पैकी सहा ट्रायल कोर्ट न्यायालये सध्या न्यायाधीश नसल्यामुळे कार्यरत नाहीत. सदर परिस्थितीमूळे संपूर्ण न्यायव्यवस्था ठप्प झाली असून, हजारो सामान्य नागरिक न्याय मिळवण्यासाठी अनिश्चित काळ वाट पाहत आहेत, असे युवा नेते प्रभाव नायक यांनी सांगितले.


राज्याचे कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना पाठवलेल्या पत्रात, प्रभव नायक यांनी नमूद केले आहे की सासष्टी तालुक्यातील दहा ट्रायल कोर्ट न्यायालयांपैकी चार वरिष्ठ नागरी न्यायालये व सहा कनिष्ठ नागरी न्यायालये आहेत. सध्या केवळ एकच कनिष्ठ नागरी न्यायालय कार्यरत आहे, आणि चारपैकी एक वरिष्ठ नागरी न्यायालय देखील रिकामे आहे. न्यायाधीशांच्या या कमतरतेमुळे प्रलंबित खटल्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, खटले सातत्याने तहकूब होत आहेत, वकिल व सामान्य नागरिकांना प्रचंड गैरसोस सहन करावा लागत आहे.


प्रभव नायक यांनी सदर पत्रात गोव्याची व्यापारी राजधानी म्हणून ओळखले जाणारे मडगाव अशा प्रकारे ठप्प न्याय व्यवस्थेची झळ सहन करू शकत नसल्याचे नमूद केले आहे. वेळेवर खटले ऐकून न घेणे व निर्णय न देणे हे केवळ घटनात्मक न्यायाच्या अधिकाराचे उल्लंघन नाही, तर शासन यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचेही प्रतीक आहे. “न्याय मिळण्यात उशीर म्हणजे न्याय न मिळणे आणि आज मडगाव या त्रासदायक वास्तवाला सामोरे जात आहे,” असे नायक यांनी स्पष्ट केले.


ही अडचण केवळ मडगावपुरती मर्यादित नाही. काणकोण तालुक्यात देखील एकमेव न्यायाधीश दीर्घकालीन रजेवर असल्यामुळे तिथले तातडीचे खटले सुमारे ४० किमी अंतरावर मडगावला पाठवावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, आणि मडगाव न्यायालयावर अधिक भार वाढत आहे, याकडे प्रभव नायक यांनी कायदा मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.


न्यायक्षेत्रातील प्रतिनिधींनी यापूर्वी अनेक वेळा सविस्तर निवेदने सरकारकडे सादर करूनही आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. “या बाबतीतले प्रशासनाचे दुर्लक्ष अत्यंत निराशाजनक असून, हे लोकशाहीतील न्यायसुलभतेच्या तत्त्वांना बाधा पोहोचवते,” असे प्रभव नायक यांनी सांगितले. आज निर्माण झालेला न्यायिक रिक्ततेचा हा प्रश्‍न कोणत्याही प्रकारे मान्य करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव तसेच इतर प्रभावित तालुक्यांतील सर्व रिक्त न्यायाधीश पदे तात्काळ भरून काढावीत, अशी जोरदार मागणी केली आहे. यासोबतच सरकारने अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पारदर्शक आणि कालमर्यादित प्रणाली लागू करावी, अशीही मागणी केली आहे. “मडगाव व गोमंतकीय जनतेला कार्यक्षम न्यायसंस्था हवी आणि सरकारला ती नाकारता येणार नाही,” असे प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!