
रवींद्र भवन मडगावची कामे खर्च मंजुरी व वर्क ऑर्डरशिवाय सुरू : विशाल पै काकोडे
कला संवर्धनासाठी स्थापन झालेले मडगावचे रवींद्र भवन आज मात्र गैरव्यवस्थापन व एकाधिकारशाहीचा अड्डा बनल्याची टीका काकोडे यांनी केली असून, यात सरकारी प्रक्रियेची झालेली उघड पायमल्ली झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. खर्च व प्रशासकीय मंजुरीशिवाय कामे सुरू करण्याची परवानगी देऊन मडगावच्या रवींद्र भवन अध्यक्षांनी केवळ शासकीय नियमांचे उल्लंघन केले नाही तर सार्वजनिक निधीचा गैरवापर रोखण्यासाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. रवींद्र भवनच्या अध्यक्षांकडून झालेला हा गंभीर गुन्हा कोणत्याही कारणावरून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, असेही विशाल पै काकोडे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले आहे.
रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी आज पत्रकारांसमोर दिलेली कबुली अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि कला व संस्कृती खात्याने तातडीने चौकशी करून यासाठी जबाबदार असलेल्यांना जाब विचारला पाहिजे व कोणतीही सार्वजनिक संस्था आर्थिक शिस्त व कायद्याच्या चौकटीबाहेर चालू देऊ नये, असे विशाल पै काकोडे यांनी ठामपणे सांगितले.
गोव्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा ही प्रामाणिकपणा व जबाबदारीवर आधारित नेतृत्वाची हकदार आहे, बेफिकीर व बेजबाबदार कारभाराची नाही. रविंद्र भवन मडगावला या गैरव्यवस्थापनातून वाचवून कलाकार व रसिकांसाठी प्रेरणास्थान म्हणून पुन्हा प्रस्थापित केले गेले पाहिजे, अशी मागणी यावेळी विशाल पै काकोडे यांनी केली.