गोवा
पृथ्वीच्या कवितेत तीव्र सामाजिक आशय : हेमा नायक
पणजी :
‘थोडें बोल्ड थोडें ओल्ड’ या काव्यसंग्रहातील कवितेमध्ये युवा कवयित्री पृथ्वी नायक हिची सामाजिक बांधिलकी आणि आशय अत्यंत तीव्रतेने दिसून येत असून, अशाच साहित्यकर्मींची आजच्या समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक हेमा नायक यांनी केले. सहित प्रकाशनच्यावतीने गोवा कोंकणी अकादेमीच्या ‘पंयलो चंवर’ योजनेमध्ये प्रकाशित झालेल्या ‘थोडें बोल्ड थोडें ओल्ड‘ या कोंकणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळाच्या वतीने महाविद्यालयात केल्यानंतर हेमा नायक बोलत होत्या. यावेळी मंचावर शिक्षण संचलनालयाचे संचालक भुषण सावईकर, गोवा कोंकणी अकादेमीचे उपाध्यक्ष रमेश घाडी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूर्णकला सामंत, पृथ्वीचे आई-वडील चंदा व चंद्रकात नायक यांची उपस्थिती होती.

आजच्या पिढीला जे बोल्डनेस आणि धाडस मिळाले आहे, ते आमच्या किंवा पुर्वीच्या पिढीला मिळाले नव्हते. आजची पिढी ज्या पद्धतीने आपले विचार अत्यंत मोकळेपणाने मांडते तसे विचार मांडण्याची आम्हाला मुभा नव्हती. पण आजची पिढी हि याबाबतीत पुढारलेली आहे, आणि हि कौतुकास्पद बाब असल्याचे हेमा नायक यांनी यावेळी नमूद केले. तर पृथ्वी नायक यांच्या कविता फार दर्जेदार आणि वयाच्या मानाने अत्यंत प्रगल्भ असल्याचे रमेश घाडी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोंकणी अकादेमीची ‘पयली चंवर’ योजना गोव्यातील गावखेड्यातील तरूण लेखकांपर्यंत पोहचवून त्याद्वारे कोंकणीत नव्या दमाचे लेखक तयार झाले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ पुर्वा वस्त यांनी पुस्तकावर आशय, विषय आणि भाषा विषयक भाष्य करत, कवितेतील विविध सौंदर्यस्थळे मांडली. यावेळी पुस्तकाचे चित्रकार समीर नाईक यांनी काढलेल्या विशेष चित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. प्राचार्य पुर्णकला सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत, तर उपप्राचार्य डॉ. डिलॅक्टा डिकॉस्टा यांनी आभार व्यक्त केले. तर स्नेहा नायक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

