मडगाव :
भारताच्या नूतन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पहिल्या भाषणात निसर्गाचा आदर करण्यावर आणि वन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर दिला हे स्वागतार्ह आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या सल्ल्याचे पालन करावे आणि तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी केली आहे.
मी भारताच्या नवीन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील पर्यावरण, जंगल, वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची गरज आहे. विनाशकारी प्रकल्प उभारण्यासाठी आज भाजप सरकार पर्यावरण नष्ट करुन जमिनी क्रोनी कॅपिटलिस्टच्या ताब्यात देत आहे असे युरी आलेमाव म्हणाले.
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या गोव्याची मातृस्वरूप आहेत. त्यांची नाळ नेहमीच निसर्गाशी जोडली गेली आहे. गोवा हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. गोवा सरकारने त्यांचे अनुभवाचे बोल ऐकले पाहिजेत असे युरी आलेमाव म्हणाले.
राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर आज आपल्या भाषणात, “हजारो वर्षांपासून, माझी जमात निसर्गाशी एकरूपतेने जगत आहे. मला माझ्या जीवनात जंगले आणि जलस्रोतांचे महत्त्व कळले आहे. निसर्गापासून संसाधने घेणे आणि तिची समान आदराने सेवा करणे हे परस्पर फायदेशीर आहे” असे उद्गार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी काढल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले व त्यांच्या शब्दांचा आदर करणे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.
गोवा सरकारने त्यांच्या भाषणातुन बोध घेवुन तीन रेषीय प्रकल्पांमधून होणारा पर्यावरण, जंगल, वन्यजीवांचा नाश थांबवण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याची वेळ आली आहे. सदर प्रकल्प रद्द करणे ही गोव्यातील या सुंदर भूमीची नेहमीम निसर्गाची पूजा करणाऱ्या राष्ट्रपतीना मानवंदना ठरेल असे युरी आलेमाव म्हणाले.