‘पंडित नेहरू आणि त्यांचे देशासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहिल’
पणजी :
गोवा सरकारने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या छायाचित्राचा मुद्दाम समावेश केलेला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. फुटीरतावादी भाजप सरकारच्या या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या छायाचित्राचा समावेश नसलेल्या गोवा सरकारने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंडित नेहरूंची स्तुती करतानाचा व्हिडिओ पाहून घेण्याचा टोमणा मारला आहे. पंडित नेहरूंचे योगदान समजून घेण्यासाठी स्वातंत्र्यानंतर २६ वर्षांनी जन्माल्या आलेल्या डॉ. प्रमोद सावंतांनी इतिहासाची पुस्तके वाचणे गरजेचे असल्याचा टोला अमित पाटकर यांनी हाणला.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच लाल बहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी तसेच इतर पंतप्रधानांचे देशासाठी खुप मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना आज काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या जाहिरातीमध्ये पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान प्रतिबिंबित झाले आहे. भाजप सरकार आपल्या फुटीरतावादी राजकारणाने देशाचे आमच्या नेत्यांचे योगदान व बलिदान पुसून टाकू शकत नाही, असे अमित पाटकर म्हणाले.
तिरंगा हातात धरलेले आमच्या महान नेत्यांचे फोटो उपलब्ध असल्याचा काँग्रेस पक्षाला अभिमान आहे. राष्ट्र उभारणीत आमच्या नेत्यांच्या योगदानाबद्दल पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. भाजपकडे त्यांच्या एकाही नेत्याच्या योगदानाबद्दल दाखवण्यासारखे काहीही नसल्यामुळे त्यांना देशाच्या फाळणीच्या स्मृती जागवुन “मूक यात्रा” आयोजित करणे भाग पडले आहे. यातून भाजपची नकारात्मकता दिसून येते, असे अमित पाटकर म्हणाले.
ब्रिटीश सरकारसमोर दया याचिका दाखल करणाऱ्या ‘माफिनामा’ फेम विनायक दामोदर सावरकर यांचा वारसा भाजपने जपला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आपल्याच निर्णयांवर वारंवार माघार घेतात किंवा स्वत:च घेतलेले निर्णय मागे घेतात, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
सरकारी यंत्रणेचा वापर करून स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून निधी वापरण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह भाजपचे नेते राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अनादर करताना संपूर्ण देशाने पाहिले तेव्हा भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला, असा दावा अमित पाटकर यांनी केला.