‘इफ्फी’त स्पेनला अभिवादन!
स्पेन आणि गोव्यात अनेक बाबतीत साम्य आहे. सूर्यास सामावून घेऊ पाहणारे सुंदर समुद्रकिनारे, जठराग्नी प्रदीप्त करत मन तृप्त करणारे खाद्यपदार्थ ते आरामदायी वामकुक्षीच्या सुखापर्यंत. परस्परांचा सन्मान करण्याचा योग या नोव्हेंबरमध्ये या उभय स्थानांसाठी आलाय. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या महोत्सवात ‘रेट्रोस्पेक्टिव्हज’ (पूर्वलक्ष्यी) विभागात दिग्दर्शक सौरा यांचे काही सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातील.
चित्रपट हे मानवी भावना व्यक्त करण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. स्पेनमधे हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे संक्रमण होत असताना तिथल्या समाजाने केलेल्या संघर्षांचे, त्या भावनांचे चित्रण कार्लोस सौरा यांच्या चित्रपटात मार्मिकपणे केले आहे. हीच त्यांची जगभरात ओळख आहे.
सौरा यांनी छायाचित्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी औद्योगिक अभियांत्रिकीचेही शिक्षण घेतले. मात्र, त्यांनी लवकरच जागतिक स्तरावर चित्रपट निर्माता म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांचा तिसरा चित्रपट ला काझा (1966) ने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिल्व्हर बेअर पुरस्कार जिंकला. त्यानंतर आलेल्या त्यांचे चित्रपट, डेप्रिसा डेप्रिसा (1981), कारमेन (1983), टॅक्सी (1997), टँगो (1998) आणि इतर अनेकांनी त्यांना ऑस्कर आणि कान्ससह बऱ्याच चित्रपट महोत्सवात अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि नामांकने मिळवून दिली.
प्रचंड गुंतागुंतीच्या कथानकात वास्तव आणि कल्पनारम्यतेची बेमालूम सरमिसळ करत, स्थळ-काळाची उत्कट अभिव्यक्ती, ही त्यांच्या असामान्य सिनेशैलीची ताकद आहे. आपल्या सृजनशील प्रतिभेमुळे कार्लोस सौरा, केवळ स्पेनच नव्हे तर जगभरातील समीक्षक आणि चित्रपट रसिकांचे लाडके आहेत.
53 व्या इफ्फीत ‘रेट्रोस्पेक्टिव्हज’ विभागात त्यांच्या – सेव्हन्थ डे, ॲना अँड द वोल्व्स, पेपरमिंट फ्राप्पे, कारमेन, क्रिआ क्युरोव्ह्स, इबेरिया, ला काझा आणि द वॉल कॅन टॉक – या निवडक 8 चित्रपटांचे प्रदर्शन करून त्यांचा सन्मान केला जाईल.
महोत्सवातील स्पॅनिश उपस्थिती केवळ या उत्तुंग सिनेव्यक्तिमत्त्वापुरती मर्यादित नाही. समकालीन सात स्पॅनिश चित्रपट महोत्सवात भाग घेणाऱ्यांना थक्क करण्यासाठी सज्ज आहेत. यामध्ये एडुआर्डो कॅसानोव्हा यांचा, ला पिएटा (2022), कार्लोस व्हरमुट यांचा मॅन्टीकोर (2022), अल्बर्टो रॉड्रिग्ज यांचा प्रिझन 77 (2022), कार्ला सिमोन यांचा अलकाराझ (2022) (इटलीसह सह-निर्मिती,2022), सेस्क गे यांचा स्टोरीज नॉट टू बी टोल्ड, अल्बर्ट सेरा यांचा (फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालसह सह-निर्मिती) पॅसिफिकेशन (2022) आणि जौमे बालागुएरोंचा व्हीनस (2022) यांचा समावेश आहे.53 व्या इफ्फी महोत्सवात स्पेनला अभिवादन करत (होला (!) म्हणत) असतानाच या सर्व चित्रपटांसह आणि बऱ्याच सिनेमांचा आस्वाद घ्या.