जांबावलीत उद्यापासून शिखरकलश प्रतिष्ठापना सुवर्ण महोत्सव
मडगाव :
श्री रामनाथ दामोदर संस्थान जांबावली येथे रविवार २७ नोव्हेंबर ते शुक्रवार २ डिसेंबर २०२२ या कालावधीत शिखरकलश प्रतिष्ठापना सुवर्णमहोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे, अशी माहिती श्री रामनाथ दामोदर संस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे यांनी दिली.
मडगाव येथे आज संस्थान समिती सदस्य गणधीश कुंदे (खजिनदार), साईश हेगडे (मुखत्यार), गजानन कुंदे (कार्यवाह सचिव) यांच्या उपस्थितीत अध्यक्ष मंजुनाथ पै दुकळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम जाहिर केला.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी अनुष्ठानाच्या महापुर्णाहूतीला उपस्थित राहणार असल्याचे मंजुनाथ पै दुकळे यांनी सांगितले.
सहा दिवसीय महोत्सवात वास्तुशांती, नवग्रह शांती, पुरुष सुक्त हवन, महारुद्र, महाविष्णु, शतचंडी, महाआरती, अन्न संतर्पण आणि इतर धार्मिक विधी संस्थानात आयोजित केले जातील. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी उत्सव, रथोत्सव, आरती व प्रसादाचे आयोजन केले जाणार असल्याचे मंजुनाथ पै दुकळे यांनी सांगितले.
श्री रामनाथ दामोदर संस्थानचे सर्व महाजन, कुळावी आणि देव दामबाबाच्या भक्तांनी उत्सवात सहभागी होऊन देव कृपेस पात्र व्हावे असे आवाहन मंजुनाथ पै दुकळे यांनी केले आहे.