‘मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला’
पुणे:
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने कर्तबगार व निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली.
ते म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून सक्षमपणे लोकसेवा केली. शहरातील राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात त्या सक्रीय होत्या. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा लाभला होता व तो त्यांनी जबाबदारीने जपला.
भारतीय जनता पार्टीचे काम करताना त्यांनी पक्षाचा ‘संगठन सर्वोपरी’, हा मंत्र जपला आणि आपल्या आचरणाने कार्यकर्त्यांसमोर उदाहरण निर्माण केले. त्यांच्या निधनाने पक्ष संघटनेची हानी झाली आहे. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.