हा कलाकार ठरला‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाचा विजेता…
मुंबई:
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु आहे. यंदा चौथ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आज बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. अक्षय केळकर हा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला.
आज (८ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. या सर्व स्पर्धकांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात चांगलीच रंगत आली होती. यावेळी डान्स, मिमिक्री आणि कॉमेडीही पाहायला मिळाली. या सोहळ्याचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी यावेळी अनेक कॉमेडी पुरस्कारही दिली. बिग बॉसमधील अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या टॉप ५ स्पर्धकांचा जबरदस्त डान्सही पाहायला मिळाला.
यादरम्यान राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. दरम्यान या तिघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले आहे.
यानंतर अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.