प्रसिध्द कवी, पत्रकार संजीव वेरेकर यांचे निधन
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध कोंकणी कवी आणि पत्रकार संजीव वेरेकर (64) यांचे आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले.
प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात चार दिवसांपूर्वी दाखल केले होते. तिथे उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सरिता, विवाहित कन्या स्नेहा मुरकुटे आणि आणखी एक कन्या समिधा असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची तारीख अजून जाहीर केलेलीं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर वास्को येथील एका खासगी इस्पितळात आतड्यावरची शास्त्रक्रिया केली होती. त्यातूनच त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना गोमेकोत दाखल करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती पुन्हा अचानक बिघडून त्यातच त्यांचे निधन झाले अशी माहिती मिळाली आहे.
त्यांच्या ‘रक्तचंदन’ या कविता संग्रहाला २०२१ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. कोकणी राजभाषा आंदोलनात त्यांनी सक्रीय भूमिका घेतली होती. आतापर्यंत त्यांचे विविध कविता संग्रह प्रसिध्द झाले असून त्यांच्या ‘अस्वस्थ सूर्य’ या कविता संग्रहाला विमला पै पुरस्कार प्राप्त झाला होता.
‘सांज सुलुस’ या कविता संग्रहाला डॉ. टी. एम. पै प्रतिष्ठान पुरस्कार, ‘वास्तू पुरुषाचो अंत जातना’ या संग्रहाला आकाशवाणी पुरस्कार तर ‘भावझुंबर’ आणि ‘मुंबर’ या संग्रहाना कोकणी भाषा मंडळ साहित्य पुरस्कार प्राप्त झाले होते.
दै. सुनापरांत मधून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती. दै. नवप्रभा या वृतपत्रात त्यांनी निवृत्त होईपर्यंत काम केले होते.