बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव
Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 :
कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतदानानंतर अनेक चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूने होते. तोच कल आता मतमोजणीतही पाहायला मिळत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेस १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६८ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २२ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, आता भारतीय जनता पार्टीने त्यांचा कर्नाटकमधला पराभव मान्य केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बसवराज बोम्मई आतापर्यंत हाती आलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, तरीदेखील आम्ही निवडणुकीत उचित लक्ष्य गाठू शकलो नाही. निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आल्यावर आम्ही त्याचं तपशीलवार विश्लेषण करू. या निकालातून धडा घेत आम्ही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुनरागमन करू.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा कल शेवटपर्यंत असाच राहिल्यास काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करू शकतं. कर्नाटकमध्ये ३८ वर्षांपासून एकाच पक्षाची सलग दोनदा सत्ता आलेली नाही. ही परंपरा यावेळी देखील कायम राहील असं दिसतंय.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानंतर तुमच्याशी कुणी संपर्क केलाय का? असा प्रश्न विचारल्यानंतर जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, आतापर्यंत माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. संपूर्ण निकाल काय लागतो ते पाहुयात. आणखी २-३ तासात चित्र स्पष्ट होईल. मी माझ्यासाठी कोणताही प्लॅन केलेला नाही. परंतु आम्हाला आणखी चांगल्या निकालाची आशा आहे. आमचा पक्ष लहान आहे त्यामुळे आमची कोणतीही मागणी नाही.