नरेंद्र मोदी ‘भारता’चे पंतप्रधान; ‘इंडिया’चे नाही…
नवी दिल्ली:
दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. प्रेसिडंट ऑफ भारत केल्यानंतर आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज बुधवारी निघणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज इंडोनेशिया येथे जाणार आहेत. ASEAN-India सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. ASEAN (दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) चं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहेत.
पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख “प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” (भारताचे पंतप्रधान) असा करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली.
‘The Prime Minister Of Bharat’ pic.twitter.com/lHozUHSoC4
— Sambit Patra (@sambitswaraj) September 5, 2023
केंद्र सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असले तरी, त्यातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रपतींच्या राजपत्रामधून ‘इंडिया’ हा शब्द गायब होऊन ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधानदुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
भाजपेतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नामकरण ‘इंडिया’ असे झाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ‘इंडिया’ या शब्दावर आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, ‘इंडिया’ नाव घेतल्याने सत्ता मिळत नसते, विरोधकांची महाआघाडी ‘इंडिया’ नव्हे तर ‘घमंडिया’ असल्याची टीका केली होती. त्यानंतर संविधानातील ‘इंडिया’ हा उल्लेख वगळण्यासंदर्भातील चर्चेला बळ मिळाले.