google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘सरकार १० दिवसांत लाभार्थ्यांना ३३०.७८ कोटींची मदत मंजूर करेल का?’

पणजी :

गोवा सरकारचे समाजकल्याण खाते, महिला व बालविकास खाते आणि क्रीडा खात्याच्या विविध योजनांच्या लाभार्थींना ३३०.७८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य सरकारने अद्याप मंजूर केलेले नाही. मागील आठ वर्षांहून अधिक काळ बाकी असलेली ३३०.७८ कोटींची संपूर्ण रक्कम १५ सप्टेंबर २०२३ पूर्वी वितरित होईल याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देतील का? असा सवाल काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.


कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रदिप नाईक तसेच शिवोलीच्या गट अध्यक्ष पार्वती नागवेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, भाजप सरकारकडे “मिशन टोटल कमिशन” च्या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसा आहे, परंतु गरजू गोमंतकीयांना देण्यासाठी निधी नाही असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.


विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या १८ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न क्रमांक १२ अ ला दिलेल्या उत्तरानुसार, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विविध समाजकल्याण लाभार्थ्यांची ३५.७३ कोटी रक्कम प्रलंबित आहे असे स्पष्ट केले आहे. यात कोविड महामारीत अडचणीत आलेल्या उपेक्षित आणि असंघटित क्षेत्राला दिलासा म्हणून २१.५० कोटी, कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या ८० कुटुंबांना १.६० कोटींची रक्कम वितरित केलेली नाही असे म्हटले आहे. याच उत्तरात पूढे, गंभीर अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य म्हणून १.६० कोटींची रक्कम वितरीत करणे बाकी आहे अशी कबुली दिल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले. या व्यतिरिक्त, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची गेल्या दोन महिन्यांपासून ५५ कोटींची रक्कम प्रलंबित आहे, असे पणजीकर यांनी निदर्शनास आणले.


सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ३.६ कोटी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ४.३७ लाख तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी १.६ कोटी अजूनही दिलेले नाहीत. सरकारने अनुसुचीत जाती व जमाती तसेच ओबिसी आणि कमजोर वर्गासाठी असलेल्या अटल आसरा योजनेचे ८.५८ कोटी दिलेले नाहीत अशी माहिती अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

३ ऑगस्ट २०२३ रोजी अतारांकित प्रश्न क्रमांक १२० ला दिलेल्या उत्तरात, महिला आणि बालविकास मंत्री विश्वजित राणे यांनी लाडली लक्ष्मी योजनेचे १५२२६ लाभार्थी १५२.२६ कोटी वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत असे स्पष्ट केले आहे. त्याच उत्तरात गृह आधार योजनेचे १३४११७ लाभार्थी मे आणि जून महिन्याच्या ४०.२३ कोटी वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत असे सांगीतले आहे. आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अर्थसहाय्य जोडल्यास हा आकडा ८०.४७ कोटी होईल, अशी माहिती अमरनाथ पणजीकर यांनी दिली.


ममता योजनेंतर्गत ४२८३ लाभार्थी एकूण ४.२८ कोटींच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि २०५५ लाभार्थी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या १.२ कोटी वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.


विधानसभेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्न क्रमांक ५क ला २७ जुलै रोजी दिलेल्या उत्तरात, क्रिडा व युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांनी विवीध खेळाडू व पदक विजेत्याना २ कोटी रुपये सरकारकडून देणे बाकी असल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. “निधीची कमतरता” असल्याने जर्मनीत “स्पेशल ओलिंपीक” मध्ये सहभागी होवून १९ पदके जिकंलेल्या दिव्यांगाना सरकारने बक्षिस रक्कम दिलेली नाही असे उत्तर गोविंद गावडे यांनी दिल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी उघड केले.


भाजप सरकार तिजोरी खाली झालेली असतानाही एका बाजूने आमदारांचे भत्ते भरमसाठ वाढवते तसेच इव्हेंट आयोजनावर करोडो खर्च करते. परंतू, गरजवंत तसेच खेळाडूना देण्यासाठी सरकारला भिक लागली आहे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!