पणजी :
अपघात टाळण्यासाठी पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने मंगळवारी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या अपघातात २७५ जणांचा बळी गेला आहे आणि ८०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रेल्वे अपघाताबाबत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष एमके शेख यावेळी उपस्थित होते.
या अपघातात मृतांचा आकडा २७५ वर गेला असून शेकडो लोक जखमी झाल्यामुळे या अपघाताचा काय परिणाम झाला हे समजू शकते असे सार्दिन यांनी सांगितले.
“हा रेल्वे अपघात संपूर्ण निष्काळजीपणामुळे आणि यंत्रणेतील गंभीर त्रुटींमुळे झालेला आहे, अपघात टाळण्यासाठी तेथे कोणतीही उपकरणे नाहीत हे सिद्ध झाले आहे,” असे ते म्हणाले.
“या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना केवळ निलंबनाला सामोरे जावे लागू नये, तर त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे. त्यांची निश्काळजीपणा या अपघाताला जबाबदार आहे,” असे ते म्हणाले.
“जर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषींवर कारवाई करण्यास गंभीर असतील तर त्यांनी आधी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना हटवावे. मोदींनी रेल्वे मंत्र्यां पासून कृती सुरू करू द्या,” असे ते पुढे म्हणाले.
‘‘रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. अपघात टाळण्यासाठी यंत्रणा बसवण्यात ते अपयशी ठरले आहे. या दुर्घटनेला ते जबाबदार आहे. या अपघाताने अनेक कुटुंबांना वेदना दिल्या आहेत, या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत,” असे सार्दिन म्हणाले.
अपघात टाळण्यासाठी यंत्रणा कार्यरत होईपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचे लोकार्पण थांबवावे, असे ते म्हणाले.
“आम्हाला आणखी अपघात आणि मृत्यू नकोत. अपघात टाळण्यासाठी उपकरणे बसवले जाईपर्यंत या गाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात यावी,” असे ते म्हणाले.
राज्याच्या समस्यांबाबत बोलताना सार्दिन म्हणाले की, कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यात गोवा सरकार अपयशी ठरले आहे. “पावसाळ्यापुर्वी जर हे रस्ते दुरुस्त करण्यात सरकार अपयशी ठरले तर पावसाळ्यात लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल,” असे ते म्हणाले.
आजकाल वीजपुरवठा खंडित होत असल्याचेही ते म्हणाले. “विद्युत विभागाने यावर वेगाने काम करावे आणि अखंडित वीजपुरवठा करावा,” असे ते म्हणाले.