‘तुम्ही फक्त उभे रहा तुम्हाला पाडणारच’
रामराजे यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खुले आव्हान
सातारा (महेश पवार) :
दिल्लीत जाण्याची माझी पाहिल्यापासूनची इच्छा आहे. आगामी काळामध्ये तुम्ही मला दिल्लीत पाठवा,बघा मी काय काय करून येतो. मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांनी आता कोणत्याही पक्षातून निवडणुकीत आमच्यासमोर यावे, त्यांना मी पाडणारच आहे. तुम्ही फक्त उभे रहा,तुम्हाला पाडून दाखवतोच,असे आव्हान आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता दिले.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी रामराजे बोलत होते.
रामराजे म्हणाले,पक्षाच्या आदेशानुसार सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ कमिट्या सक्षम करण्यात येत आहेत.ग्रामपंचायत, नगरपालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांना बूथ कमिट्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या यंत्रणेचे सहकार्य कायमस्वरूपी मिळणार आहे.
भाजपच्या निवडणुकीतील रणनीतीला तोडीस तोड उत्तर देणारी यंत्रणा बूथ कमिट्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यात उभी करणार आहे.आमच्या जिल्ह्यातील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळीच भाजपला संपवणार आहेत. तालुक्यात स्थानिक पातळीवर आमचेच दोन गट तयार झाले आहेत. ते दोन्ही गटा एकत्र आणण्याचे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत.
खरे तर १९९६ साली आपल्या तालुक्यातील निवडून आलेले खासदार पुन्हा अनेकदा उभे राहिले परंतु त्यांना जनतेने कधीच स्वीकारले नाही,हा इतिहास आहे.’त्यांचे वडील चुकून निवडून आले होते. त्याचप्रमाणे हेसुद्धा २०१४ साली चुकून निवडून आले. ते काही फलटण तालुक्यामुळे निवडून आले नाहीत,तर माळशिरस तालुक्यामुळे निवडून आले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून अपघाताने निवडून आलेल्या खासदारांबाबत आपल्याला निर्णय करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहावे.गेल्या काही वर्षांपासून फलटणचे राजकारण आम्ही एकतर्फी करून दाखवले आहे.तसेच एकतर्फी राजकारण करण्यासाठी बूथ कमिट्यांची रचना ताबडतोब करावी. क्रियाशील बूथ कमिट्या तयार कराव्यात.बूथ कमिट्यांमुळे पुढील निवडणुकीतील आपले कामकाज सोपे होणार आहे. हे सगळे लोक आज पाणी प्रश्नावर बोलू लागले आहेत;पण जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर सगळे कष्ट आमचेच आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. हिम्मत असेल तर खासदारांनी फक्त आर्टिकल ३७२ काढून,पाणीप्रश्नाची भाषा करावी,असे आव्हानही रामराजे यांनी दिले.
पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक आ. शशिकांत शिंदे,आ.अरुण लाड, आ. दीपक चव्हाण,पक्षाच्या आयटी सेलचे प्रदेशप्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,’महानंद’चे संचालक डी. के. पवार उपस्थित होते.