महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मणिपूरची परिस्थिती शांत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
उपाध्यक्ष रोशन देसाई, सरचिटणीस लिबी मदियरा आणि पणजी गटाच्या सरचिटणीस ईसलिंडा गोन्साल्वीस उपस्थित होते.
नाईक म्हणाल्या की, मणिपूरमध्ये पाच हजारांहून अधिक घरांना आग लावण्यात आली आहे, तर या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. “सुमारे साठ हजार लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. तरीही मणिपूर सरकार आणि केंद्र सरकार कारवाई करत नाही,” असे त्या म्हणाल्या.
बीना नाईक म्हणाल्या की, मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी महिलांची नग्न परेड केल्याच्या व्हायरल व्हिडिओचा निषेध केला आहे.
“राज्यपाल अनुसुईया उईके यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना विचारले आहे की महिलांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही. अशा कृत्यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करते, परंतु सरकार अपयशी ठरले आहे, ” असे ती म्हणाली
त्या म्हणाल्या की, मणिपूरचे भाजपचे आमदार पौलियनलाल हाओकीप यांनी आरोप केला आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याच आमदारांना भेटत नाहीत, जे त्यांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी त्यांची वाट बघत होते.
“मोदी आपल्याच पक्षाच्या आमदारांचे ऐकत नाही तर ते जनतेचे कसे ऐकणार. “आपण अराजकतेकडे चाललो आहोत का, जिथे सरकार लोकांचे ऐकत नाही आणि हिंसा करणारे कायद्याचा आणि घटनेचा विचार करत नाहीत,” असा सवाल तिने केला.
“मी सरकारला मणिपूरच्या हितासाठी काम करण्याचे आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करते,” असे ती म्हणाली.