37th National Games: 37व्या राष्ट्रीय खेळाचा समारोप समारंभ गुरुवारी ताळगाव पठारावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होत असून या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गोव्यात दाखल झाले आहेत. क्रीडास्पर्धेच्या आयोजनाबाबत उपस्थितांकडून कौतुक होत असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
आपले मनोगत मांडताना सावंत म्हणाले, इथून पुढे राज्यातील 39 मैदाने ठराविक खेळांसाठी नामांकित केली जाणार आहेत. गोव्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
आतापर्यंत गोव्याला केवळ पर्यटन राज्य म्हणून ओळख प्राप्त झाली होती मात्र आता गोवा क्रीडा स्पर्धांसाठी ओळखले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
तसेच यापुढे सर्व सरकारी खात्यात खेळाडूंसाठी 4 टक्के आरक्षण देणार असल्याचीही महत्वाची घोषणाही त्यांनी केली. राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधा व मानव संसाधन आम्ही तयार केले असून याचा फायदा यापुढे राज्यातील खेळाडूंना होणार असल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी दिली.