‘गोव्यातील कलाकारांना वंचित का ठेवले जात आहे?’
मडगाव :
“गोव्यातील प्रतिभावान कलाकारांना बाजूला सारुन, श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे संगीतमय कार्यक्रम भाजप सरकारने गोव्याबाहेरील कलाकारांना दिले. हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वयंपूर्ण गोवा आहे का? गोव्यातील कलाकारांना संधी कधी मिळणार? कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे समाजमाध्यम प्रमुख दिव्या कुमार यांनी केली आहे.
श्रीराम मंदिर उद्घाटनानिमीत्त आयोजित तीन दिवसीय उत्सवाचा भाग म्हणून काल रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित संगीत मैफलीत गोव्याबाहेरील कलाकारांच्या कार्यक्रमानवर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. सदर कलाकारांची मैफल रवींद्र भवन, वास्को आणि गोव्यातील इतर काही ठिकाणी होणार आहे.
गोव्यातील गायक आणि संगीतकारांना कार्यक्रमाची संधी का दिली गेली नाही? भाजप गोव्यातील कलाकारांसोबत “कमिशन डील” सेट करू शकत नाही म्हणून का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष दिव्या कुमार यांनी केला.
मडगावाच्या रवींद्र भवनातील तीन दिवसीय कार्यक्रमाचा अंदाजे खर्च 1.25 कोटी होता. मडगाव आणि फातोर्डा येथील विविध मंदिरात मडगावचे आमदार व फातोर्डाचे माजी आमदार यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा खर्च सदर खर्चातूनच भागविण्याचा त्या दोघांचा डाव होता. सरकारी पैशाने आपली पोळी भाजून घेण्याचा मडगावचे आमदार व फातोर्डाचे माजी आमदार प्रयत्न करीत होते, असा गौप्यस्फोट दिव्या कुमार यांनी केला.
आम्ही प्रत्येक कार्यक्रमावर आणि विशेषतः खर्चावर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमचे कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीचे चित्रीकरण करुन पुरावे गोळी करत आहेत जेणेकरुन आम्ही सदर कार्यक्रमासाठी खोटे दावे व बिले सादर करण्याचा व रक्कम लाटण्याच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करू शकू, असे दिव्या कुमार म्हणाले.
भाजपच्या खोट्या प्रचारात गोमंतकीयांनी वाहून जाऊ नये. श्रीरामाच्या नावाचा वापर करून आपली तिजोरी भरण्याचा डाव काहीजण करीत आहेत. गोमंतकीयांनी अशा संधीसाधूपासुन सावध राहणे गरजेचे आहे, असे दिव्या कुमार म्हणाले.