‘शाळा अर्ध्यावर सोडण्यासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करा’
मडगाव :
ये तो होना ही था! जेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाळा अर्ध्यावर सोडणाऱ्यांसाठी “मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी धोरण” जाहीर केले तेव्हाच मी धोक्याची घंटा वाजवली होती. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 12 टक्के घट झाल्याचे दर्शवणारी आकडेवारी चिंताजनक आहे. सरकारने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासातील प्रगत प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे तयार करावीत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, भाजप सरकारच्या सदोष धोरणांचा हा परिणाम असू शकतो असे म्हटले आहे. या घटत्या संख्येचे अचूक कारण शोधण्यासाठी सरकार त्वरित सविस्तर अभ्यास करेल आणि सुधारात्मक पावले उचलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
माझ्या विधानसभेच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेखाली इयत्ता पाचवी ते नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकार दरमहा 8000, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 8000 आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 10000 प्रति महिना देत असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या योजनेंतर्गत, शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सरकारी विभागात फक्त ठराविक कालावधीसाठी काम करण्याची परवानगी मिळते. मात्र, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला कायमस्वरूपी नोकरी देण्याची सदर योजनेत कोणतीच तरतूद नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे, असे युरी आलेमाव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मागील विधानसभा अधिवेशनादरम्यान मी सरकारने ढोबळपणे जाहीर केलेली सदर योजना दीर्घकाळात आपत्ती ठरेल आणि अल्पावधीसाठी स्टायपेंड म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेवर लक्ष ठेवून विद्यार्थी अर्ध्यावरच शाळा सोडतील, असा इशारा दिला होता याकडे युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि कौशल्य विकासाच्या प्रगत प्रशिक्षणासाठी योजना सुरू करणे महत्वाचे असून त्यामुळे विद्यार्थ्यांना देशाचे चांगले नागरिक बनण्यास आणि आधुनीक उद्योगांसाठी प्रगत प्रशिक्षणार्थी बनण्यास मदत होईल असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.