google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘बेती-पणजी फेरीबोट’वरुन युरी आलेमाव यांनी सरकारला धरले धारेवर… 

पणजी :
इतिहासाची पुनरावृत्ती झाली, सरकारने धडा घेतला नाही हे उघड. जुलै 2018 बेती – पणजी मार्गावर “पिएदाद फेरी” बंद पडली. जून 2024, तीच “पिएदाद फेरी” त्याच मार्गावर अडकली. महिलांसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे सरकारचे बचाव कार्य पाहून भाजप सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा परत एकदा पर्दाफाश झाला, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

बेती-पणजी मार्गावरील फेरी बंद पडून चार तासांहून अधिक काळ अडकून पडलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 2018 चा एक व्हिडीओ जारी करून त्याच मार्गावर तीच फेरीबोट बंद पडल्याचे उघड केले आहे तसेच भाजप सरकारने गेल्या सहा वर्षात फेरीबोटींच्या देखभालीवर काहीच उपाययोजना केल्या नसल्याचा दावा केला.

काँग्रेस सरकारच्या काळात 1986 आणि 1988, 1991, 1996 इत्यादी मध्ये खरेदी केलेल्या फेरी बोटी भाजप सरकार अजूनही चालवत आहे. या फेरी बोटी पूर्ण पारदर्शकता राखून खरेदी करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आजतागायत कार्यरत आहेत. काँग्रेस सरकार नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करते आणि म्हणूनच या सर्व फेरी बोटी चालवण्यास आजही योग्य आहेत. दुर्दैवाने सदर  फेरीबोटींची देखभाल करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

सोलर फेरी बोट “परवडणारी नाही” असा स्पष्ट शेरा बंदर कप्तानानी मारुनही भ्रष्ट भाजप सरकारने “सोलर फेरी बोट” खरेदी केली, मात्र सदर फेरीबोटीच्या उद्घाटनाच्या एका वर्षाच्या आत नदी परिवहन  मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सदर सोलर फेरी बोट “परवडणारी” नसल्याचे मान्य केले, यावर युरी आलेमाव यांनी बोट ठेवले.

बेती-पणजी फेरीबोट बंद पडण्याच्या कालच्या घटनेने नदी परिवहन खाते  तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचाही ढिसाळ कारभार उघड झाला आहे. काल पिएदाद फेरीवर अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी चोडण मार्गावरील  फेरीबोट आणण्यात आली होती. परिणामी चोडण-रायबंदर मार्गावर गोंधळ निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे नदी परिवहन खात्याकडे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही उपकरणे नसल्याचा पर्दाफाश झाला आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

सरकारने नवीन प्रयोग करणे थांबवले पाहिजे आणि आपली क्षमता सिद्ध केलेल्या फेरी बोटींचा ताफा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भाजप सरकारने सौर फेरी बोटी आणि रो-रो फेरी बोटींवर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, असा सल्ला युरी आलेमाव यांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!