भाजप खंडणीबहाद्दर माफियाला प्रोत्साहन देत आहे : अमित पाटकर
पणजी :
गेल्या ४ महिन्यांतील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पक्षांतर बहाद्दर आमदार संकल्प आमोणकर यांना “हप्तेखोरी मंत्रालय” देण्याची चांगली बातमी दिली होती हे आता वर्तमानपत्रांतील बातमी स्पष्ट करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने भाजप सर्वच क्षेत्रात माफियांकडून माया कमवत आहे. खंडणीबहाद्दर संकल्प आमोणकर आपल्या लालसेपोटी गोवा संपवायला निघाला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी त्यांच्यावर एकतर त्वरित कारवाई करावी किंवा ते या रॅकेट मध्ये सामील असल्याचे मान्य करावे अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी राजकीय दबावाचा वापर करून मुरगाव बंदरात दादागीरी व हप्तावसुली सुरू केल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी देशाचे पंतप्रधान ते गोव्याचे मुख्यमंत्री या हप्तावसुली प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला.
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या खंडणी माफियांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि मालवाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुरगाव बंदरात विशेष दल तैनात करावे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.
फेब्रुवारी २०२४ मध्ये मुरगावच्या आमदाराच्या धमक्यांमुळे मुरगाव बंदरात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या गोव्यातून बाहेर जात असल्याच्या बातम्या आल्या तेव्हा मी पक्षांतरबहाद्दर आमदार संकल्प आमोणकर यांच्या दादागीरीकडे प्रधानमंत्री कार्यालयाचे लक्ष वेधले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कारवाई करण्याचे आवाहन केले होते. खंडणीबहाद्दर मुरगावच्या आमदाराला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
पक्षबदलू संकल्प आमोणकर यांना लोकांच्या कल्याणाची आणि आरोग्याची चिंता नाही हे मुरगाववासीयांनी समजून घेतले पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उकळलेल्या पैशाचा वाटा देण्याचे काम संकल्प आमोणकर करत असल्यानेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना लवकरच बक्षीस देण्याची घोषणा केली होती, असे अमित पाटकर म्हणाले.