‘देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन खा. रणजितसिंहानी धुमाकूळ घातलाय’
सातारा (महेश पवार) :
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्हाला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. 17-18 वर्षाच्या मुलांच्या तडीपारच्या याद्या चौकीत घेऊन माजी खासदारांना बसण्याची वेळ का आली? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सांगून इथं धुमाकूळ घालत आहेत, असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीत नाईक निंबाळकर यांनी ‘राष्ट्रमत’कडे केले.
सातारा जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आवरा अन्यथा नाईलाजणे ‘तुतारी’ हातात घ्यावी लागेल असा थेट इशारा दिला आहे. त्यानंतर आता विश्वजित नाईक निंबाळकर यांनीदेखील राष्ट्रमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावरच भर दिला.
यावेळी त्यांनी नमूद केले कि, चुकीच्या सर्व्हेक्षणामुळे लोकसभेची जागा हातातून गेली. मात्र त्यातून काही समजून न घेता, आता विधानसभा निवडणुक जवळ आल्याने आमच्या गटातील लोक फोडण्याचे केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
वाई विधानसभा मतदारसंघातील खंडाळा तालुक्यात विश्वजीत नाईक निंबाळकर यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. मात्र वाई विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चेला फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम देत ,उमेदवारी मला नाही तर माझ्या मित्राला म्हणजेच दिवंगत माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांना मिळाली पाहिजे असे ठामपणे सांगितले.
खरंतर खंडाळा तालुक्यातील अनेक गावे ही फलटण मतदारसंघात यायची परंतु यामुळे येथील लोकांच्या सोबत नाळ जोडली गेली आहे. आज जरी मतदारसंघ वेगळा झाला असला तरी आमची नाळ येथील जनतेशी जोडली गेली असल्याने आम्ही त्यांच्या गाठीभेटी आजही घेत असल्याचे विश्वजीत नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले विश्वजीत नाईक निंबाळकर पाहुयात…