गोवा
‘मृदुला सिन्हा यांची आठवण पुस्तकरूपात कायम असेल’
'महिला म्हणजे अविकसित पुरुष नाही'चे मुख्यमंत्र्यांनी केले प्रकाशन
पणजी :
गोव्याच्या माजी राज्यपाल दिवंगत मृदुला सिन्हा या जशा धडाडीच्या नेत्या होत्या तशाच त्या अत्यंत संवेदनशील अशा साहित्यिकादेखील होत्या. जगण्याच्या विविध विषयांना त्यांनी आपल्या लेखांमधून आणि कथांमधून खूप सहज आणि आत्मीयतेने स्पर्श करत ते विषय खूप उत्तम पद्धतीने वाचकांसमोर आणले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेकविध विषयांवर सखोल चिंतन करणारी पुस्तके प्रकाशित केली. मधल्या काळात त्यांचे निधन जाले. पण ज्योती कुंकळकर यांनी मृदुला सिन्हा यांच्या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित करत त्यांच्या आठवणींना आणि विचारणा उजाळा दिला आहे, हे प्रशंसनीय आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ज्योती कुंकळकर यांचे कौतुक केले.
माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हिंदी लेख संग्रहाचे ज्योती कुंकळकर यांनी अनुवादित केलेल्या आणि सहित प्रकाशन प्रकाशित ‘महिला अविकसित पुरुष नाही’ या पुस्तकाचे प्रकाशन अनौपचारिकरित्या महालक्ष्मी निवासस्थानी केल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार केदार नाईक, संपदा कुंकळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना या पुस्तकाच्या अनुवादिका ज्योती कुंकळकर यांनी सांगितले कि, मृदुला सिन्हा या सशक्त लेखिका होत्या. त्या नेहमीच म्हणायच्या कि, सशक्तीकरण फक्त महिलांचे नाही तर, संपूर्ण कुटुंबाचे होणे गरजेचे असते. हा त्यांचा संदेश मला व्यक्तिगतरीत्या खूप महत्वाचा वाटतो. यापूर्वी त्यांच्या ‘मुलगी आहे विशेष’ या पुस्तकांचे देखील अनुवाद करण्याची संधी मला मिळाली, पण आजच्या काळात त्यांच्यासारख्या संवेदनशील लेखिकेची उणीव मला नेहमीच भासते, असेही त्या म्हणाल्या.
या अनौपचारिक कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार संपदा कुंकळकर यांनी मानले.