google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

मौलिक कल्पना प्रदीर्घ काळ टिकतात : ए. आर. रहमान

संगीतकार ए. आर. रहमान यांना नागालँडमधल्या वार्षिक हॉर्नबिल स्पर्धेत पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण आले आणि तिथूनच त्यांचा माहितीपट निर्माता म्हणून प्रवास सुरू झाला.

त्याची परिणती झाली ती ”हेडहंटिंग टू बीट बॉक्सिंग” या माहितीपटात !  देशाच्या ईशान्येकडच्या नागालँड राज्यातल्या नागा जमातीच्या सांगीतिक प्रवासाचा मागोवा हा माहितीपट दर्शवतो. एकेकाळी हिंसाचार आणि रक्तपातात बुडालेल्या नागालँड संगीताच्या उपचारात्मक ताकदीने कसे सावरले, सांगीतिक पुनर्जागरणातून कसे पुनरुत्थान घडले, हे हा माहितीपट सांगतो. गोव्यात 55 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी ) या माहितीपटाचा  प्रीमियर झाला.

“नागा लोक अत्यंत संगीतप्रिय आहेत. या राज्यात संगीत आणि कला मंत्री देखील आहेत,”  गोव्यात इफ्फी 2024 दरम्यान कला अकादमी येथे ”लता मंगेशकर स्मृती व्याख्यानमाला : भारतातील संगीत रंगभूमी यावर  ‘इन कॉन्व्हर्सेशन सत्रात आज ए.आर. रहमान बोलत होते.

“पाश्चात्य जग आपल्या संगीत रंगभूमीच्या माध्यमातून  मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित करते.  आपल्याकडेही यासाठी आवश्यक असलेली सर्व कला क्षमता आहे. मात्र आपण पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर देशांकडून वित्तपुरवठा मिळवण्यासाठी ती अधिक रसिकप्रिय करण्याची  गरज आहे,” असे रहमान यांनी सांगितले.

“वाढत्या शहरीकरणामुळे आणि अरुंद जागांमुळे घरे अनेकदा कारागृहासारखी भासतात. या पार्श्वभूमीवर सकारात्मकतेसाठी आपण लोकांना उत्कट कला अनुभूती देण्याची गरज आहे.  देशाच्या अनेक भागांमध्ये संगीत नाटकाचा वारसा समृद्ध असल्याने, तो आपल्याला एक करणारा घटक आहे.   संगीत रंगभूमीसाठी पाश्चिमात्य देशांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने,  संगीत आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत संगीत रंगभूमीचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे जेणेकरुन ती परदेशी पर्यटकांसाठी, आकर्षण ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

आपल्या प्रेरणांबद्दल रहमान यांनी सांगितले, “लताजी या परिपूर्णतेचे मूर्त स्वरूप आहेत. मायकल जॅक्सन सारख्या कलाकारांसोबत त्या माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत.”

रहमान यांनी संयुक्त अरब अमिरातीतील त्यांच्या अलीकडील कार्यक्रमाविषयी उत्साहाने सांगितले. भारतीय संगीत त्यांनी तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवले.

सत्रात सहभागी झालेल्यांच्या संगीतविषयक प्रश्नांना उत्तर देताना रहमान यांनी ”मौलिक कल्पना दीर्घकाळ टिकतात ” असा सल्ला दिला.

संगीत उद्योगावर कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) तंत्रज्ञानाच्या च्या प्रभावाविषयी रहमान यांनी भूमिका मंडळी.  एआयचा वापर अधिक चांगले आणि अर्थपूर्ण डब तयार करून उत्तम सांगीतिक अनुभवासाठी व्हावा . ”मात्र  यामुळे लोकांच्या रोजगारावर गदा येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,” असे ते म्हणाले.

क्लाउड बेस्ड म्युझिकवरदेखील रहमान यांनी आपली भूमिका मांडली.  सर्व क्लाउड-आधारित संगीत नाहीसे झाले तर, याचा विचार करून आपल्याकडे ॲनालॉग प्रती देखील असायला हव्यात. ” एखाद्या कलाकाराच्या संगीताची प्रत्यक्ष प्रत जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा आपण त्याच्याप्रती आपला आदर व्यक्त करत असतो,” असे मत रहमान यांनी व्यक्त केले.

या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध पत्रकार नमन रामचंद्रन यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!