
अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन
बीआर चोप्रांच्या महाभारतातली कुंतीपुत्र कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer) काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी दुजोरा दिला आहे. कर्करोगानं पंकज धीर यांचं निधन झालं असून त्यांच्या पश्च्यात त्यांचा एक मुलगा आणि सून आहे. मुलगा निकितिन धीर इंडस्ट्रीत काम करत असून त्याची पत्नी कृतिका सेंगरसुद्धा (Kratika Sengar) अभिनेत्री आहे.
पंकज धीर यांना कर्करोग झालेला, पण मोठ्या धीरानं कॅन्सरशी लढा देऊन ते बरेही झालेले. पण, काही महिन्यांतच कॅन्सर उलटला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. बराच काळ ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. कॅन्सरमुळे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झालेली होती. पंकज यांच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
पंकज धीर यांनी टीव्ही आणि सिनेक्षत्रात विविध प्रोजेक्ट्स केलेत. दरम्यान, 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या बीआर चोप्रांच्या महाभारत या मालिकेनं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्यानी कर्णाची भूमिका साकारलेली. त्यानी ज्या गांभीर्यानं ही भूमिका साकारली, त्याचं उदाहरण आजही दिलं जातं. कर्णाची भूमिका साकारल्यानंतर त्यांना कर्ण म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. टीव्ही शो व्यतिरिक्त, पंकजनं चित्रपटांमध्येही काम केलं. ते चंद्रकांता आणि द ग्रेट मराठा यासारख्या अनेक पौराणिक शोचा भाग होते. त्यांनी सोल्जर, बादशाह आणि सडक यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते.