आलेमाव, कार्लूस यांनी घेतली न्यायमूर्ती रिबेलो यांची भेट
पणजी: विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी शनिवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती फ़ेर्दिन रिबेलो यांची भेट घेतली आणि राज्यातील समस्यांवर चर्चा केली.
हळदोणचे आमदार अॅड. कार्लूस फॅरेरा देखील यावेळी उपस्थित होते आणि त्यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
“गोव्याचे पर्यावरण आणि परंपरा जपण्यासाठी अशा व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणे हे दिलासादायक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही आमच्या गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशेने काम करू, याची मला खात्री आहे,” असे आलेमाव यांनी न्यायमूर्ती रिबेलो यांची भेटी घेतल्यावर सांगितले.
“सामान्य लोक राज्यात होत असलेल्या विध्वंसक कृतींमुळे नाराज आहेत. पण परिस्थिती अशी आहे की काहीजण त्याबद्दल आपला आवाज काढत नाहीत, कारण सध्याचे सरकार सूडाचे राजकारण करते. जे लोक बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध बोलतात त्यांना मारहाण केली जाते किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्रास दिला जातो. मला विश्वास आहे की न्यायाधीश रिबेलो यांनी केलेले आवाहन आमच्या लोकांना आमच्या गोव्याचे रक्षण करण्यास प्रोत्साहित करेल,” असे आलेमाव म्हणाले.
“कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर, डोंगर कापणी, जमीन रुपांतरीत करणे, हप्ते वसुली आणि भ्रष्टाचारावर बोलले तर, भाजप त्यांच्या विरोधात ’नॅरेटीव्ह’ तयार करतात. परंतु जेव्हा सतर्क लोक बोलतात, तेव्हा त्यांच्यापुढे झुकणे किंवा आयटी सेलद्वारे होणारा द्वेष कमी करणे या शिवाय दुसरा मार्ग भाजपकडे राहत नाही.” असे आलेमाव म्हणाले.
आलेमाव यांनी सांगितले की त्यांना वैयक्तिकरित्या वाटते की गोव्याच्या सर्व बेकायदेशीर कामांवर कारवाई करून गोव्याची पुन्हा उभारणी करणे आणि समाजात बंधुत्व पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे.
“न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी आमच्या गोव्याचे संरक्षण करण्याचे जे आवाहन केले आहे, त्याला मी पूर्णपणे समर्थन देतो. गोव्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राज्यात होणाऱ्या बेकायदेशीर कृतीविरुद्ध बोलण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन आलेमाव यांनी केले.
