मडगाव रवींद्र भवनात “ऑल इज नॉट वेल”असल्याचे उघड : मोरेनो रिबेलो
मडगाव :
रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी मडगाव येथील रवींद्र भवन येथे संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करत नसल्याची कबुली देऊन स्वत:चाच पर्दाफाश केला आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सांस्कृतिक संस्थांना अनुदान देण्यात भाजप सरकारचे अपयश आणि चित्रपटाशी संबंधित उपक्रम राबवण्यात गोवा मनोरंजन संस्थेचे अपयशही त्यांनी उघड केले आहे, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी केला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आणि दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी राजेंद्र तालक यांच्या विधानाचा निषेध केला ज्यात त्यांनी खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे वास्कोचे असून त्यांना मडगाव किंवा फातोर्डाची माहीत नसल्याचा दावा केला होता.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी रवींद्र भवन, मडगाव येथे संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्गाची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले आणि युवकांना खासगी संस्थानी आकारलेले भरमसाठ शुल्क भरणे परवडत नाही. अशा खासगी संस्थांना राजेंद्र तालक सारख्या लोकांचे संरक्षण आहे, असे मोरेनो रिबेलो म्हणाले.
आम्ही मागणी करतो की राजेंद्र तालक यांनी फातोर्डा आणि मडगाव येथे संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग चालवित असल्याचा दावा केलेल्या सर्व 20 सांस्कृतिक संस्था आणि 15 खाजगी संस्थांची नावे सार्वजनिक करावीत आणि प्रत्येक संस्थेने आकारलेल्या शुल्काच्या तपशील उघड करावा, अशी मागणी मोरेनो रिबेलो यांनी केली.
रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी कला अकादमीत कार्यरत असलेले नृत्य शिक्षक मडगाव आणि फातोर्डा येथे खासगी क्लास घेत असल्याचा पर्दाफाश केला आहे. सरकारी नोकर खाजगी क्लास कसा घेऊ शकतो? कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि गोवा मनोरंजन संस्थेचे चेअरमन डिलायला लोबो यांनी राजेंद्र तालक यांच्याकडून कला आणि संस्कृती खाते आणि इएसजीचे अपयश दर्शवणाऱ्या विधानांवर स्पष्टीकरण मागवावे अशी मागणी, मोरेनो रिबेलो यांनी केली.
राजेंद्र तालक यांनी रवींद्र भवनच्या एनेक्स बिल्डिंगच्या वापराबद्दल जनतेला सांगणे गरजेचे आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की ही इमारत का वापरात नाही आणि किती काळ ती वापरात नाही. मला राजेंद्र तालक यांना सांगायचे आहे की ही इमारत संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी बांधण्यात आली होती आणि सदर वर्ग सुरू करणे गरजेचे आहे, असे मोरेनो रिबेलो म्हणाले.
मी राजेंद्र तालक यांना कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात रवींद्र भवन कार्यकारी समितीवर नियुक्त केलेल्या समिती सदस्यांचे कोणते योगदान आहे हे सार्वजनिक करण्याचे आव्हान देतो. सदर समितीवरील ९० टक्के गॉडमन दिगंबर कामत आणि फातोर्डाचे पराभूत आमदार दामू नाईक यांचे कार्यकर्ते असल्याचा थेट आरोप मोरेनो रिबेलो यांनी केला.