पणजी :
३३ सदस्यांचा पाठिंबा असलेल्या गोवा भाजपचे राज्यसभा उमेदवार सदानंद शेट तानावडे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. विरोधी सदस्यांनी आज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार उभा न करण्याचा एकमताने निर्णय घेतला.
भाजपचा प्रखर विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाने राज्यसभा निवडणुकीत तांत्रिक कारणामुळे आपला उमेदवार उभा केला नाही. काँग्रेसकडे गोवा विधानसभेत केवळ ३ सदस्य आहेत. राज्यसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी नियमानुसार
काँग्रेसकडे विघानसभा संख्याबळ १० टकके याप्रमाणे ४ सदस्य असणे आवश्यक होते.
दुसरीकडे संयुक्त विरोधी पक्षांचा उमेदवार उभा राहिला असला तरी त्यासाठी ७ सदस्यांची आवश्यकता असते. पैकी एकाने माघार घेतली असती तर विरोधी उमेदवारांवर नामुष्की ओढवली असती.
दरम्यान, आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. केंद्रीय समितीने आजच त्यांच्या नावाची घोषणा केली होती. राज्यात भाजपप्रणित सरकारकडे दोन वा मत असल्याने तानावडे बहुमताने निवडून येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी तानवडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी सावंत मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री, भाजप, मगो समर्थक, अपक्ष आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
गोव्यातल्या राज्यसभेच्या जागेची मुदत २८ जुलैला संपत असल्याने त्या ठिकाणी २४ जुलै रोजी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १३जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. १४ रोजी अर्जाची छाननी होईल. १७ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.