मुंबई :
इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन (Palestine) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India) इस्राइलला जाणारी आपली उड्डाणं रद्द केली आहेत. आमचे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही एअर इंडियाची इस्राइलला जाणारी उड्डाणं ही 14 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या कालावधीमध्ये ज्या लोकांनी बुकिंग केले होते, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचं आश्वासन एअर इंडियाकडून देण्यात आलं आहे.
एअर इंडियाकडून दर आठवड्याला इस्राइलमधील तेल अवीवच्या दिशेने पाच उड्डाणं करण्यात येतात. याआधी शनिवार (7 ऑक्टोबर) रोजीचे फ्लाईट क्रमांक AI 139 आणि परतीचे फ्लाईट AI 140 जे नवी दिल्ली ते तेल अवीव उड्डाण करणार होते, ते देखील रद्द करण्यात आले.
शनिवारी (7 ऑक्टोबर) रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून पॅलेस्टाईन आणि इस्राइल या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पेटली. आतापर्यंत इस्रायलमध्ये सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1590 लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये 232 लोकांचा मृत्यू झाला आणि 1790 लोक जखमी झालेत. गाझामध्ये असलेल्या पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 256 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 20 मुलांचा समावेश आहे. तर यामध्ये आतापर्यंत 1788 पॅलेस्टिनीही जखमी झाले आहेत.