google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘सनबर्नवर कडक लक्ष ठेवा’

पणजी :

गोव्यातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक महोत्सवांमध्ये ड्रग्जच्या कथित सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ‘सनबर्न’ महोत्सवावर कडक नजर ठेवण्याची मागणी केली आहे व असे प्रकार घडल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असे म्हटले आहे.

या संदर्भात भंडारी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संबंधित विभागांना निवेदन दिले आहे. “सनबर्न सारखे ईडीएम उत्सव नेहमीच आपल्या गोव्याचे नाव बदनाम करणारे वाद निर्माण करतात असे त्यांनी म्हटले आहे.

2009 मध्ये, नेहा बहुगुणा, अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मरण पावली, 2014 मध्ये मुंबईतील फॅशन डिझायनर ईशा मंत्रीचा अमली पदार्थांच्या अतिसेवनाने ईडीएम उत्सवा नंतर मृत्यू झाला आणि 2019 मध्ये, साई प्रसाद (32 वर्ष), वेंकट सत्यनारायण (31 वर्ष) आणि संदीप कोट्टा (२४ वर्षे) या 3 तरुणांचा मृत्यू झाला,” असे भंडारी यांनी निवेदनात म्हटले आहे.“२०१२ मध्ये, सनबर्नच्या आयोजकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ईडीएम आयोजकांना आरोप सिद्ध करावे अन्यथा बिनबुडाचे आरोप केल्या प्रकरणी माफी मागावी असा इशारा दिला होता. नंतर 2013 मध्ये, स्थानिक चॅनेल एचसीएन ने उघड केले की सनबर्न ईडीएम आयोजक व्यावसायिक कर आणि इतर कर कसे चुकवत आहेत. या वृत्तानंतर व्यावसायिक कर आयुक्तांनी ईडीएम ठिकाणावरील तिकीट काउंटरवर कर्मचारी तैनात केले, ” असे निवेदनात पुढे म्हटले आहे.


“2016 मध्ये, सनबर्न ईडीएम महोत्सवाचे आयोजक पुणे-महाराष्ट्र येथे गेले. तेव्हा स्थानिकांनी ते नग्नता, अश्लीलता, दारू आणि अमली पदार्थाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. स्थानिक लोकांच्या तीव्र नाराजीमुळे, सनबर्नला पुण्यातील 3 वर्षांच्या अल्प कालावधीत दोनदा उत्सवाची ठिकाणे बदलणे भाग पडले. सनबर्नचे आयोजक गोव्याप्रमाणेच महसूल जमा करण्यात अयशस्वी ठरल्याने, त्यांनी गोव्यात परत येण्याचा आटोकाट प्रयत्न केला,” असे निवेदनात म्हटले आहे.

भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सनबर्न गोव्यात परतले तेव्हा डिसेंबर 2019 मध्ये 3 तरुणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे अशा ईडीएम उत्सवांबद्दल पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले.

15 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत पर्यटन हंगामाच्या दरम्यान मेगा ईडीएम फेस्टिव्हलला परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय का बदलला आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे.


हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा नुकताच गोव्यात अंमली पदार्थाच्या अतीसेवना मुळे मृत्यू झाल्याने आणि इतर प्रकरणांमुळे गोव्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी अशा ईडीएम उत्सवांवर कडक लक्ष ठेवण्याची गरज भंडारी यांनी व्यक्त केली आहे.

कोणतीही अनुचित घटना घडल्यास काँग्रेस कार्यकर्ते योग्य व्यासपीठाचा वापर करून अशा घटनांविरोधात आवाज उठवतील आणि भविष्यातील सर्व परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा भंडारी यांनी सरकारला दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!