Allu Arujn Pushpa 2 : हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियर वेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांनी सोमवारी अभिनेत्याला नोटीस बजावून मंगळवारी सकाळी ११ वाजता चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले.
यानंतर अल्लू अर्जूनची लिगल टीम त्याच्या निवासस्थानी पोहोचली आहे. संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी “पुष्पा २: द रुल” च्या प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर थिएटर व्यवस्थापन, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाव गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. शहर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आणि दुसऱ्याच दिवशी त्याची तुरुंगातून सुटका झाली. आता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांची नवी नोटीस आली असून, त्याचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.
हैदराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कायदेशीर मत घेऊन या प्रकरणात पुढील कारवाई करणार आहेत. अल्लू अर्जुनने केलेले दावे खोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी रविवारी संध्या थिएटरमधील घटना घडली त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले होते.