का होतेय #Ban_adipurush ची मागणी?
ओम राऊतच्या आदिपुरूष या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता होती. हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, या चित्रपटातील संवादावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. राजकीय वर्तुळातही चित्रटपावर आक्षेप घेण्यात आले आहेत. काश्मीर फाईल्स, द केरला स्टोरी या चित्रपटांना पाठिंबा देणारा भाजपा पक्ष आदिपुरूष चित्रपटातील चुकांवर का बोलत नाही, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे.
काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी आदी पक्षाच्या नेत्यांनी आदिपुरुष या चित्रपटावर आक्षेप व्यक्त केला आहे. या चित्रपटामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच चित्रपटाच्या निर्मितीसाठी भाजपाच्या नेत्यांनी मदत केलेली आहे, असा आरोप या पक्षांकडून करण्यात आला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तर आदिपुरूष चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. तसेच आदिपुरूष चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. “या चित्रपटात अत्यंत असभ्य भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. या भाषेमुळे लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. धर्म आणि धर्माचा व्यवसाय यात फरक आहे. चित्रपटाच्या लेखकाने भगवान हनुमानाच्या तोंडी ‘तेरे बाप की जली’ अशा प्रकारचे संवाद घातले आहेत. हे अतिशय घाणेरडे संवाद आहेत,” असे श्रिनेत म्हणाल्या.
भूपेश बघेल यांनीदेखील या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. “आपल्या सर्व देवतांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण प्रभू राम आणि भगवान हनुमानाचे कोणताही अविर्भाव नसेलेल चेहरे पाहिलेले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी प्रतिक्रिया बघेल यांनी दिली.
“भगवान हनुमानाला ज्ञान, भक्ती, शक्तीचे प्रतिक म्हटले जाते. आमच्या लहानपणापासून आम्ही हेच ऐकत आलो आहोत. या चित्रपटात प्रभू रामाला एक योद्धा म्हणून दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील भाषा आणि संवादामध्ये सभ्यपणा नाही. तुलसीदास यांच्या रामायणात प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे,” अशी टीका बघेल यांनी केली.
“पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी रामानंद सागर यांना रामायणावर आधारित एका अजरामर मालिकेची निर्मिती करण्यास सांगितले होते. ही मालिका नंतर खूप प्रसिद्ध झाली. आदिपुरुष चित्रपटात प्रभू राम आणि हनुमानाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून तरूण पिढीला काय शिकायला मिळणार आहे?” असा सवालही भूपेश बघेल यांनी केला.
विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटावर भाजपाचे प्रवक्ते प्रविण शंकर कपूर यांनीदेखील आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून सेन्सॉर बोर्डाने त्याचे पुन्हा एकदा परीक्षण करायला हवे, असे प्रविण शंकर कपूर म्हणाले आहेत. “आदिपुरूष चित्रपटाला सर्वत्र विरोध केला जात आहे. त्यामुळे आक्षेपार्ह दृष्य आणि संवादाचे पुन्हा एकदा परीक्षण करायला हवे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरत रोखायला हवे,” अशी भूमिका कपूर यांनी घेतली आहे.