देश/जगमहाराष्ट्र
भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची ‘फेलोशिप’
नवी दिल्ली :
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी – कादंबरीकार – समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना यंदाची साहित्य अकादमीची फेलोशिप घोषित झाली आहे.
१९६८ साली साहित्य अकादमीने या फेलोशिपची सुरुवात केली. त्या वर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पहिले फेलो करण्यात आले. त्यानंतर हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिकांना दिला जातो. मराठीसह इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील अनेक श्रेष्ठ लेखकांना आजवर ती प्राप्त झाली आहे.
सदर फेलोशिप उद्या, २६ फेब्रुवारी रोजी मुंबई-दादर येथील सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, येथे सकाळी ११ वाजता साहित्य अकादमीचे अध्यक्ष आणि जेष्ठ कन्नड साहित्यिक चंद्रकांत कंबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे, यांच्या अध्यक्षतेखाली ‘संवाद’ या विशेष कार्यक्रमात प्रदीप देशपांडे, प्राची गुर्जरपाध्ये हे नेमाडे यांच्या साहित्यावर सादरीकरण करतील.
या पूर्वी मराठी मध्ये वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर यांना ही फेलोशिप मिळाली होती. आणि आता भालचंद्र नेमाडे यांना ती दिली जात आहे. लवकरच त्यांचा ‘सट्टक’ हा कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. नेमाडे यांना अकादमीची हि फेलोशिप जाहीर झाल्यामुळे साहित्य वर्तुळात विशेष आनंद व्यक्त होत आहे.