कॅसीनोच्या प्रवेशद्वारावर बेकायदा तिरंगी कमानी; काँग्रेसतर्फे सरकारचा निषेध
मडगाव:
कॅसिनोच्या प्रवेशद्वारावर भारतीय तिरंग्याच्या रंगानी उभारलेल्या बेकायदा कमानीला परवानगी देण्याची भाजप सरकारची कृती धक्कादायक आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना तात्काळ कारवाई करून फुटपाथ अडवुन पादचाऱ्यांना अडथळा आणणारे व राष्ट्राच्या चिन्हांचा अपमान करणारी सदर कमान ताबडतोब काढून टाकावी आणि जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा प्रत्येक देशभक्त भारतीयासाठी अभिमान आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग एकता, अखंडता, सौहार्दाचे प्रतीक आहेत. बेकायदेशीर प्रवेशद्वार उभारण्यासाठी हे रंग वापरणाऱ्या काळ्या कृत्यांचे केंद्र असलेल्या जुगाराच्या अड्ड्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे, हे धक्कादायक आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन जवळ येत असताना, भाजप सरकारचा खोटी देशभक्ती आणि राष्ट्रवाद जवळपास रोजच उघड होत आहे आणि भाजपचेच नेते तिरंगा आणि राष्ट्रगीताचा अनादर केला जात असल्याचे उघड करीत आहेत. कॅसिनोला तिरंग्याचे रंग बेकायदेशीर कमानीवर वापरण्याची परवानगी दिल्याने भाजप सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्यातील कॅसिनो हे बेकायदेशीर आणि अनैतिकतेचे प्रतीक बनले असल्याने सरकारने कॅसिनोवर राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रीय चिन्हे वापरण्यास बंदी घालावी अशी माझी मागणी आहे. आम्ही त्यांना आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करू देऊ शकत नाही, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्यातील कॅसिनो हे भाजप कॅडरसाठी माया कमविण्याचे स्त्रोत बनले आहेत आणि म्हणून सरकार त्यांच्या सर्व बेकायदेशीर गोष्टींकडे डोळेझाक करत आहे. मी पुन्हा एकदा सरकारला बेकायदेशीर प्रवेशद्वार विरुद्ध ताबडतोब कारवाई करण्याचा इशारा देतो. सरकारने कारवाई न केल्यास आम्ही जबरदस्तीने ते हटवणार असल्याचा इशारा युरी आलेमाव यांनी दिला आहे.