आलेक्स सिक्वेरांचे नोकरी विक्री माफियांना संरक्षण ?: अमरनाथ
पणजी :
कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या कौटुंबीक संबंधामुळेच एका मुलीला आरोग्य खात्यात नोकरी मिळाल्याचे मान्य केले आहे. त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन १२०० नोकऱ्या दिल्याचा दावाही केला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये कोणीतरी पैशाची मागणी केली होती असा दावाही त्यांनी केला आहे. कायदा मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करून नोकरी विक्री माफियांना संरक्षण दिल्याबद्दल त्यांची त्वरित चौकशी करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आपले कौटुंबीक संबंध असल्यानेच एका डॉक्टर मुलीला आरोग्य सेवेत नोकरी मिळाली आणि मंत्रीपदाचा गैरवापर करुन आपण जवळपास १२०० नोकऱ्या दिल्या असा दावा करत, दोन्ही प्रकरणात कोणीतरी पैसे गोळा केले होते हे कॅमेरासमोर मान्य केल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना अमरनाथ पणजीकर यांनी आलेक्स सिक्वेरा यांच्यावर पक्षपातीपणा आणि वशिलेबाजी तसेच भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याचा गंभीर आरोप केला.
भाजप सरकारच्या एका कॅबिनेट मंत्र्याकडे आरोग्य खात्यातील नोकरीच्या बदल्यात ३० लाखांची लाच मागितल्याची माहिती एका मुलीच्या वडिलांनी दिल्यावर त्याची तक्रार न केल्याने आलेक्स सिक्वेरांकडून ‘भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे’ हे स्पष्ट प्रकरण आहे. त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन नोकरी दिलेल्या १२०० उमेदवारांकडून पैसे गोळा करणाऱ्यांवरही कारवाई केली नाही. आलेक्स सिक्वेरा यांनी दोन्ही प्रकरणाची तक्रार तात्काळ पोलिसांना का दिली नाही? असा सरळ प्रश्न अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.
“भ्रष्टाचारावर पांघरुण घालणे” हेच भाजपचे धोरण आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी “एटेम्पट टू करप्शन” हा शब्दप्रयोग भ्रष्ट मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर केला होता. त्याच मॉविन गुदिन्गो विरोधात पर्रीकर यांनी स्वत: भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला होता, याची आठवण अमरनाथ पणजीकर यांनी करुन दिली आहे.
कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास एक वर्षापूर्वी ३० लाखांची मागणी करणाऱ्या व्यक्तीचा सध्याच्या ‘जॉब्स फॉर सेल’ घोटाळ्याशी काही संबंध आहे का, याचा तपास करणे आवश्यक आहे. संबंधित डॉक्टर मुलीचीही चौकशी झाली पाहिजे. ‘सेल ऑफ जॉब’ घोटाळ्याची सुत्रे मोठ्या राजकारणांच्या हातातच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
आपण मंत्रीपदाचा गैरवापर करुन १२०० लोकांना नोकरी दिल्याचा दावा आलेक्स सिक्वेरा यांनी केला आहे. सदर उमेदवारांकडून काहिजणानी पैसे घेतल्याची माहिती त्यांनीच उघड केली आहे. सदर पैसे जरी उमेदवारांना परत केले असा दावा त्यांनी आता केला असला तरी कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सर्व १२०० जणांची नावे जाहिर करावीत तसेच पैसे घेणारे लोक कोण होते हे सांगावे, अशी ठान मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
भाजपने गोवा उध्वस्त केला असून आता आपल्या शिक्षीत बेरोजगार युवकांचे भवितव्यच संपविण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. गोमंतकीयांनी आता भाजप सरकार विरोधात प्रखर उठाव करण्याची वेळ आली आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.