‘त्या’ आठ आमदारांना कोणतीही अपेक्षा नाही : सी. टी. रवी
गोवा काँग्रेसला सोडचिट्टी देत 8 आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना मंत्रीपदे मिळणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. यापार्श्वभूमीवर भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी आज मोठे विधान केले आहे. या 8 आमदारांना कोणतीही अपेक्षा नाही, त्यामुळे गोव्यातील मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची गरज नाही. असे त्यांनी म्हटले आहे. गोवा भाजप कोअर कमिटीची मिटींग आज पणजी येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.
मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी गोवा मंत्री मंडळविस्तारावर मोठं विधान केले आहे. ते म्हणाले की, भाजपमध्ये दाखल झालेले आमदार संतुष्ट आहेत. त्यांचे पक्षाप्रती समर्पण असल्याने त्यांना कोणताही हव्यास नाही. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे कामकाज न बदलता सुरु राहू शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षातील काही सदस्यांचा मंत्रिमंडळ फेरबदलास विरोध केला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोवा भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे आठ आमदार आणि गोव्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या पुर्वीच स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यावरुन मंत्रीमंडळ विस्तार शक्य आहे अशी भुमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी केलेले विधान या निर्णयाचा भाग असल्याची चर्चा आहे.