विनायक खेडेकर, प्रभाकर कारेकर यांना ‘गोमंतक विभुषण’ जाहीर
गोवा राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या गोमंतक विभूषण पुरस्कारांची घोषणा आज, बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोना महारोगराईमुळे त्या वर्षी या पुसस्काराचे वितरण होऊ शकलेले नाही, त्यामुळे सन 2019-20 आणि 2021-22 अशा दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दर दोन वर्षांनी राज्य सरकारतर्फे हे पुरस्कार दिले जातात.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, दर दोन वर्षांनी राज्य सरकारतर्फे गोमंतक विभुषण पुसस्कार दिला जातो. कोरोनाकाळात हे पुरस्कार दिले गेले नव्हते. लोककला क्षेत्रातील सेवेबद्दल विनायक विष्णू खेडेकर यांना सन 2019-20 चा गोमंतक विभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तर 2021-22 या वर्षासाठी संगीत क्षेत्रातील प्रभाकर जनार्दन कारेकर यांची निवड करण्यात आली आहे. गोवा स्टेटहुड डे निमित्त 30 मे रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, काही दिवसांपुर्वी माझ्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली होती. निवड समितीने या निवडी केल्या आहेत. समितीकडे आलेल्या अर्जातून ही निवड करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत डॉ. अनिल काकोडकर, आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया, लॅम्बार्ट मस्कारन्हेस, रघुनाथ माशेलकर, लक्ष्मण पै आणि डॉ. प्रेमानंद रामाणे या मान्यवरांना आत्तापर्यंत हा पुरस्कार देण्यात आला आहे.