पणजी :
अयशस्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या तोंडावर आणखी एक चपराक. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या नियतकालिक लेबर फोर्स सर्व्हेत गोव्याचा बेरोजगारी दर ८.७ टक्के दाखविला असून तो राष्ट्रीय सरासरी ४.५ टक्क्यांहून जास्त आहे. भाजप गोव्याला उद्ध्वस्त करत आहे, असा टोला काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी हाणला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण मंत्रालयाच्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण 2023-24 च्या अलीकडील अहवालाचा संदर्भ देत, दिव्या कुमार यांनी नोकरीच्या संधी प्रदान करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मोठा गाजावाजा करून भाजप सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची स्थापना केली. आयपीबी ही भाजपसाठी “मनी मेकिंग खिडकी” बनली आहे. आयपीबीने मंजूर केलेला प्रत्येक प्रकल्प गोव्याला उद्ध्वस्त करत आहे, असे दिव्या कुमार म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मे 2024 मध्ये केलेल्या विधानाची मला गोमंतकीयांना आठवण करून द्यायची आहे ज्यात ते म्हणाले होते की स्कोच ह्या खासगी कंपनीने तयार केलेल्या अहवालातील आकडेवारी दर्शवते की आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारतचे मिशन उच्च विकास, नियंत्रित महागाई आणि रोजगार निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहे, असे दिव्या कुमार म्हणाले.
त्यांनी त्याच्या एक्स हँडलवर असेही लिहिले होते की, “२०१४ ते २०२४ या काळात भारतात ५१.४० कोटी व्यक्ती-वर्षांच्या रोजगाराची निर्मिती झाली, असे सदर स्कोच अहवालात नमूद केले आहे. आता केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या अहवालाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे, असे दिव्या कुमार यांनी म्हटले आहे.
भाजप सरकार मोदी आणि शहा यांच्या क्रोनी क्लब सदस्यांना जमिनी विकण्यात व्यस्त आहे. इतर सर्व खात्यांना बायपास करण्यासाठी आणि किकबॅक आणि कमिशनवर लक्ष ठेवून प्रकल्प मंजूर करण्यासाठी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची स्थापना करण्यात आली. भाजप सरकार रोजगार निर्मितीबाबत अनभिज्ञ आहे, असा आरोप दिव्या कुमार यांनी केला आहे.