Rajasthan new CM : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी भजनलाल शर्मा!
Rajasthan new CM :
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना भाजपने तिथे नेतृत्वबदल केल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. वसुंधराराजे, दिया कुमार यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. परंतु भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरत अखेर भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री Rajasthan new CM म्हणून घोषणा केली.
राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी आणि विनोद तावडे यांचं पर्यवेक्षक मंडळ आज सकाळी जयपूरला रवाना झालं. तिथे त्यांनी नवनिर्वाचित आमदारांशी सविस्तर चर्चा केली. दुपारी ४ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडल्यानंतर सर्व आमदारांच्या पाठिंब्याने विधिमंडळ नेता म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भजनलाल शर्मा सांगानेरचे आमदार असून भाजपचे सरचिटणीस आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या आमदारांनी त्यांना आपला नेता म्हणून पसंती दिली. निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांची भेट घेतली होती.