‘कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील ‘यांच्या’वर कठोर कारवाई करावी’
मडगाव :
प्रचंड प्रदूषण, बेकायदेशीर अतिक्रमणानंतर आता कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधून कायद्याचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांकडून धोकादायक कचरा टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे जमीन कापणी केली जात आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता सदर बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणे करुन इतरांना वचक बसेल अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
बेकायदेशीर जमीन कापणी आणि भराव टाकल्याबद्दल भरारी पथकाकडून आलेल्या तक्रारीच्या आधारावर, उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा न्यायिक शाखेने ग्लोबल इस्पात लिमिटेडला जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीस तथा काम बंद आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी आपण कोणत्याही बेकायदेशीर कामाना थारा देणार नाही व असली प्रकरणे खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा दिला.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहती शेजारील क सर्व्हे क्रमांक 303/3 मध्ये बेकायदेशीरपणे जमीन तोडणे आणि भराव टाकणे चालू आहे. कारणे दाखवा नोटीसीनुसार आता प्रतिवादी मेसर्स ग्लोबल इस्पात लिमिटेडला मडगावच्या नगर नियोजन खात्यात वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही अधिकृत वकिलाद्वारे सर्व आवश्यक परवानग्या, मंजूरी आणि परवान्यासह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 3 मे 2023 रोजी सदर नोटीस जारी केली असून, नोटीस मिळाल्यापासून 24 तासाचा अवधी देण्यात आला आहे.
कुंकळळी औद्योगिक वसाहतीच्या आजूबाजूची जमीन आणि हिरवळ नष्ट करण्याचे प्रयत्न काही औद्योगिक आस्थापनांकडून होत आहेत. गोवा विधानसभेत मी हा मुद्दा अनेकदा मांडला होता. सरकार आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर काय कारवाई करते ते पाहूया, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.