डॉ. जयवंतराव सरदेसाई यांचे निधन
मडगाव:
युनो या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी मोलाचे कार्य केलेले प्रसिद्ध किटाणूशास्त्रज्ञ डॉ. जयवंतराव सरदेसाई (94) यांचे आज दुपारी निधन झाले. उद्या सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगावच्या मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. सरदेसाई हे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे वडील असून जेष्ठ पत्रकार राजू नायक तसेच प्रसिद्ध चित्रकार डॉ. सुबोध केरकर यांचे ते सासरे होत. त्यांच्यामागे पुत्र विजय तसेच कन्या डॉ. सविता केरकर, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
Saddened by the passing away of Veteran Environmentalist, Konkani Mogi, Former Ambassador of United Nations Dr. Jaiwantrao Sardessai Bab. My condolences to his Son & Fatorda MLA Bab @VijaiSardesai & Family. May his Soul rest in peace. pic.twitter.com/Xajahd8jUD
— Yuri Alemao (@Yurialemao9) June 21, 2023
डाॅ. सरदेसाई यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावल्याने त्यांना सुरुवातीला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पीतळात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिरस्थावर झाल्यानंतर ते साळगाव येथे आपली कन्या सविता केरकर यांच्या घरी रहायला गेले होते. तिथेच आज दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
गोव्यात कोकण रेल्वे सुरु हाेण्यास सगळीकडे विरोध होत असताना डॉ. सरदेसाई यांनी या प्रकल्पाला खंबीरपणे पाठिंबा दिल्याने आणि कोकण रेल्वे सध्याच्या मार्गाने सुरु झाल्यास पर्यावरणावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही हे शास्त्रोक्तपणे पटवून दिल्यामुळे या रेल्वेचा मार्ग खुला झाला होता. गोव्यासाठी त्यांचे हे मोठे योगदान होते.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, कोकणी मोगी, संयुक्त राष्ट्राचे माजी राजदूत डॉ.जयवंतराव सरदेसाई यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांचे पुत्र आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि कुटुंबाप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
गोव्याने एक प्रामाणिक, समर्पित आणि वचनबद्ध निसर्गप्रेमी गमावला आहे. आकू एक दयाळू मनाचे व्यक्ती माणूस होते ज्यांनी सर्वांच्या ह्रदयात आदराचे स्थान घेतले होते.