
लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर भीषण स्फोट! ८ जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या जवळ हाय सेक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर जवळपासच्या गाड्यांनी देखील पेट घेतल्याची माहिती मिळत आहे आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. हे आकडे वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या स्फोटानंतर तीन ते चार अन्य वाहनांनाही आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले. दरम्यान या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एएनआयशी (ANI) बोलताना, उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा व सुव्यवस्था अमिताभ यश यांनी सांगितले की, डीजीपींनी उत्तर प्रदेशातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील धार्मिक स्थळे, संवेदनशील जिल्हे आणि सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. संवेदनशील भागांमध्ये गस्त आणि तपासणी वाढवण्याचे आदेश लखनऊ येथून जारी करण्यात आले आहेत.
अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील स्फोटानंतर माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलवर आय २० ह्युंदाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या गाड्या आणि रस्त्यावरून जाणारे लोक जखमी झाल्याची महिती आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच १० मिनिटांत दिल्ली गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली आहेत. एनएसजी आणि एनआयएच्या पथकाने एफएसएलबरोबर सखोल चौकशी सुरू केली आहे.
जवळपासच्या सर्व ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरा आणि बाकी सर्व गोष्टींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माझे सीपी दिल्ली आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी यांच्याशी बोलणे झाले आहे आणि हे दोघे घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन याची सखोल चौकशी होईल. चौकशीतून जे समोर येईल ते लोकांसमोर ठेवले जाईल. मी थोड्याच वेळात घटनास्थळावर जात आहे आणि रुग्णालयात देखील जाईन, असे अमित शाह म्हणाले आहेत.



