“अपयश ही फक्त एक घटना; व्यक्ती कधीच अपयशी नसते”
गोव्यातील पणजी इथल्या कला मंदिरात मास्टरक्लासमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणातून शेकडो लोकांना पूर्णपणे गुंतवून ठेवले. ‘हार मानणे हा पर्याय नाही’ या विषयावरील सत्रात त्यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आणि विचारांनी उपस्थितांची मने जिंकली.
अनुपम खेर यांनी ‘सारांश’ चित्रपटातील मुख्य भूमिका गमावल्याचा आणि चित्रीकरणाच्या काही दिवस आधी ती पुन्हा मिळवल्याचा किस्सा सांगून सत्राची सुरुवात केली. या भूमिकेसाठी सहा महिने मनापासून तयारी केल्यानंतर, अचानक आलेला नकार त्यांच्यासाठी धक्कादायक होता. निराशेच्या गर्तेत असताना आणि मुंबईला कायमचा निरोप देण्याचा निश्चय केला असताना, ते दिग्दर्शक महेश भट्ट यांना शेवटचे भेटायला गेले. अनुपम खेर यांची तीव्र प्रतिक्रिया पाहून भट्ट यांनी फेरविचार केला आणि त्यांना पुन्हा चित्रपटात घेतले. पुढे हा चित्रपट खेर यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला. या अनुभवावर भाष्य करताना, खेर यांनी सांगितले की ‘सारांश’ने त्यांना हार न मानण्याचा धडा शिकवला. तो धक्का म्हणजे त्यांच्या उदयाची केवळ सुरुवात होती, असे ते म्हणाले.
“माझी सर्व प्रेरणादायी भाषणे माझ्या जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत”
अनुपम खेर यांनी सत्रादरम्यान स्वतःच्या आयुष्यातील अनेक उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की, 14 सदस्यांच्या एकत्र कुटुंबात आणि एका लहानशा कनिष्ठ-मध्यमवर्गीय घरात राहत असूनही, त्यांच्या आजोबांचा स्वभाव निवांत आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनोखा होता. त्यांनी परिस्थिती प्रतिकूल असूनही आपल्या आनंदी बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची आजोबांची शिकवण उपस्थितांना सांगितली.
“अपयश ही फक्त एक घटना आहे, व्यक्ती कधीच अपयशी नसते”
अनुपम खेर यांनी आपल्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. त्यांचे वडील वन विभागात लिपिक होते, त्यांनी आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा घडवला हे त्यांनी सांगितले. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात खेर यांचा 58 वा क्रमांक आल्याचे जेव्हा वडिलांना समजले, तेव्हाचा प्रसंग त्यांनी सांगितला. निकालामुळे नाराज होण्याऐवजी, त्यांचे वडील काही वेळ गप्प राहिले आणि म्हणाले, “जो मुलगा वर्गात किंवा खेळात प्रथम येतो, त्याच्यावर तो विक्रम कायम राखण्याचा दबाव असतो, कारण त्यापेक्षा कमी काहीही मिळाले तर ते अपयश वाटते. पण जो 58 वा आला आहे, त्याच्याकडे आपली स्थिती सुधारण्याची मोठी संधी आहे. म्हणून, माझ्यावर एक उपकार कर, पुढच्या वेळी 48 वा ये.”
“स्वतःच्या बायोपिकमध्ये मुख्य नायक बना”
संपूर्ण सत्रात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक घटना आणि उदाहरणे देऊन उपस्थितांना त्यांचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी स्पष्ट केले की व्यक्तिमत्व म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वतःसोबत निवांत असणे. त्यांनी प्रेक्षकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि त्यांच्या स्वतःच्या बायोपिकमधील मध्यवर्ती पात्र बनण्याचे वारंवार आवाहन केले. त्यांनी प्रश्न केला, “आयुष्य सोपे किंवा सरळ का असावे? आयुष्यात समस्या का असू नयेत? कारण तुमच्या समस्याच तुमच्या बायोपिकला सुपरस्टार बायोपिक बनवतील.”
या आनंदी ‘वन-मॅन शो’ने प्रश्नोत्तराच्या सत्रातही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या समारोपाच्या उत्तरात ते म्हणाले, “‘हार मानणे हा पर्याय नाही’ हे केवळ एक वाक्य नाही. हे अविश्वसनीय कठोर परिश्रम आहेत. माझा विश्वास आहे की तुम्हाला काही हवे असेल, तर तुम्हाला त्याग करावा लागेल आणि चिकाटी ठेवण्यासाठी स्वतःला त्याचे महत्व पटवून द्यावे लागेल. तुम्हाला निराशा सहन करावी लागेल. पण जर तुम्ही हार मानली, तर मित्रांनो, तुमची गोष्ट तिथेच संपेल.”






