वाजत गाजत आले गणराय…
कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात गणरायाचे आगमन उत्साही व भक्तिमय वातावरणात झाले. गणरायाचे जयघोषात स्वागत केल्यानंतर आज विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोविडमुळे गेली दोन वर्षे मनमोकळेपणाने गणेश चतुर्थी साजरी करता आली नाही. यंदा कोविड पुर्णपणे नष्ट झाला नसला तरी त्याचा प्रभाव बऱ्यापैकी मर्यादित झाला आहे. त्याशिवाय सर्वव्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्याने लोकांच्या हाती पैसे खेळू लागला आहे. यामुळे बाजारातही गेले आठवडाभर तेजी दिसून आली. याच उत्साहपूर्ण वातावरणात आज गणरायाचे घरोघरी आगमन झाले. काहीजणांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणरायाची मूर्ती आणली. तर काही जणांनी आज सकाळी गणरायाला घरात आणले.
आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन जाण्यासाठी लहान, मोठे, श्रीमंत, गरीब, व्यापारी, गृहणी, ज्येष्ठ नागरिक, बच्चे कंपनी यांची लगबग दिसून आली. अनेक मंडळांच्या गणेश मूर्ती नेहमीप्रमाणेच भव्य आणि आकर्षक आहेत. आज भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाची पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठापना करण्यात आली.
घरात शहरात, मंडळात गणेशाचे प्रसन्न आगमन हे प्रत्येक भाविकांच्या चेहन्यावर आनंद उमटवून गेले. आजपासून गणेशाच्या आगमनाने सर्वत्र वातावरण भारावलेले व आणि भक्तीमय दिसून आले. समाज माध्यमावर गणरायाच्या धडाकेबाज आगमनाची धूम होती. मंगलमय चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छांनी अनेकांचे व्हॉटस्अॅप स्टेटस् हाऊसफूल झाले होते.
ज सकाळी गणरायाची विधीवत पुजा झाल्यानंतर दुपारी बालगोपाळ आरती करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाताना दिसत होते. सर्वत्र घुमट आरतीचा निनाद, तर काही ठीकाणी टाळ मृदूंगाच्या निनादात आरती करत होते. मग संध्याकाळच्या सत्रात भजनाचा स्वर कानी पडत होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणून आज भाविकांनी आपल्या गणरायाच्या दीड दिवस, म्हणा पाच दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस उपासना करायला सुरुवात केली.