‘गोव्यात “फ्री फॉर ऑल” परिस्थिती…’
पणजी :
गोव्याची राजधानी पणजी शहराचे ओंगळवाणे दृश्य गोवा विद्यापीठाच्या एका सहाय्यक प्राध्यापकाने कथन केले आहे. हीच परिस्थिती राज्यातील प्रत्येक भागात आहे. गोवा आता “फ्री फॉर ऑल” स्थळ झाले असून, राज्यातील घडामोडींवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. उशिरा का होईना, मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करण्यासाठी पाऊले उचलावीत , अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोवा विद्यापीठातील हिंदीचे सहाय्यक प्राध्यापक आदित्य शेणवी भांगी यांनी पणजीत दारूड्यांकडून त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन करणारा एक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेत्यांनी गोव्याची ढासळणाऱ्या प्रतीमेवर सरकारचा लक्ष ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
काही दिवसांपूर्वी, पणजीतील ऐतिहासिक आझाद मैदानावर मद्यपींच्या उघड कारनाम्यांवर एक चित्रफीत जारी करून आम्ही चिंता व्यक्त केली होती. परंतू,सदर घटनेतून शासनाने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे. मद्यपी लोकांना त्रास देतच आहेत, युरी आलेमाव म्हणाले.
दारुडे, भिकारी आणि इतर समाजकंटकांवर कारवाई करण्यास शासन का टाळाटाळ करत आहे? गोव्यातील प्रत्येक ट्रॅफिक सिग्नल आता भिकाऱ्यांनी काबीज केला आहे, प्रत्येक शहर व गावांतील बागेतील प्रत्येक बाकांवर किंवा सार्वजनीक ठिकाणी दारुड्यांचा कब्जा आहे, प्रत्येक बस स्टँड समाजकंटक व उपद्रवी लोकांच्या ताब्यात आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
गेल्या विधानसभा अधिवेशनात मी गोव्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि लोहिया मैदान, आझाद मैदान, विविध हुतात्मा स्मारके यासारखी ठिकाणे “ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे” म्हणून अधिसूचित केलेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. सरकार लवकरच अधिसूचना जारी करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला त्यावेळी दिले होते. सरकारने आता तरी जागे होवून ऐतिहासीक स्थळांचे रक्षण करण्यासाठी पाऊले उचलावीत असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
गोव्यातील एका किनाऱ्यावर “फ्री स्टाईल” भांडणाचा व्हायरल झालेला व्हिडीयो पाहून मला धक्काच बसला. आमचे समुद्रकिनारे बेकायदेशीर मालिश करणारे, दलाल आणि दारुड्यांनी भरलेले आहेत. गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारकडे यंत्रणाच नाही. गोव्याची ओंगळवाणी प्रतिमा आपण किती काळ ठेवणार? असा सवाल युरी आलेमाव यांनी केला.
गोव्याला स्वच्छ, सुरक्षित आणि सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी देणे महत्त्वाचे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. पर्यटन विभागाने इतर विभागाच्या कामात लक्ष घालण्याचे बंद करुन, जेट्टी धोरणाला चीरशांती देवून, चांगले पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला पूढे आणण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.