google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…सरकारलाच कौशल्य शिक्षणाची गरज’



मडगाव :

भाजप सरकारकडे रोजगार संधी निर्माण करण्याची कोणतीच योजना नाही. राज्यातील ७० टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचे सीएमआयईच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. प्रशासन चालविणे सरकारला जमत नाही हे मागील दहा वर्षांत सिद्ध झाले आहे. रोजगाराभिमूख योजना चालीस लावण्यासाठी भाजप सरकारलाच कौशल्य शिक्षणाची गरज आहे, अशी बोचरी टीका विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.



२०१२ च्या निवडणुकांपुर्वी गोव्यातील शिक्षीत बेरोजगारांना बेकारी भत्ता देण्याचे आश्वासन भाजपने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. त्यानंतर ५० हजार, १० हजार नोकऱ्या देण्याची आश्वासने सरकारने सातत्याने दिली. २०१७ व २०२२ च्या निवडणुकीतही भाजपने सरकारी नोकऱ्यांचे गाजर युवकांना दाखवीले. प्रत्यक्षात गोव्यातील शिक्षीत युवकांच्या पदरी काहीच पडले नाही असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

बेरोजगारीला सरकार जबाबदार नाही असे वक्तव्य करुन मुख्यमंत्र्यांनी कौशल्य शिक्षणाच्या अभावावर बोट ठेवणे यातून सरकारची वैचारीक दिवाळखोरी पूढे आली आहे. भाजप सरकारला नोकऱ्या विकत घेण्याचे कौशल्य युवकांमध्ये अभिप्रेत असावे हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसते असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.



७० टक्के पदवीधरांना नोकरी नाही, हे सीएमआयईच्या सर्वेक्षणाने परत एकदा उघड झाल्याने मागिल अहवालावेळी सदर अहवालच चुकीचा असल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच अहवालावर आपली भूमिका बदलावी लागली. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निती आयोगानेही गोव्यातील बेरोजगारीचा आकडा जाहिर करुन भाजप सरकारला घरचा अहेर दिला हेही नसे थोडके असे युरी आलेमाव म्हणाले.

कौशल्य शिक्षणाकडे बोट दाखवणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सदर शिक्षणाचे महत्व युवकांना पटवून देण्यासाठी काय केले हे सांगावे. केवळ फाजील प्रसिद्धी घेण्यासाठी “रोजगार मेळावे” घेणाऱ्या भाजप सरकारकडे गोव्यातील बेरोजगारांची साधी आकडेवारी नाही हे मागच्या विधानसभा अधिवेशनांतील तारांकीत प्रश्नांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.



कॉंग्रेस पक्षाने २०२२ च्या निवडणुकीत जारी केलेल्या जाहिरनाम्यात गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना जाहिर केली होती. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या “गोवा व्हिजन २०३५” अहवालावर आधारीत कॉंग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभ्यास करुन तो चालीस लावल्यास गोव्याला भेडसावणारे केवळ बेरोजगारीच नव्हे तर इतर सर्व प्रश्न सुटतील असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!