गोव्यातील वाढत्या अपघातांची ‘डीजीपी’कडून दखल
गोव्यात सध्या रस्ते अपघातांसोबतच चोरी, लूटमार, खून आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गोवा पोलीस याबाबत सतर्क राहून आपले कर्तव्य बजावताना आपल्याला दिसतात. याच पार्श्वभूमीवर गोव्याचे डीजीपी जसपाल सिंग आयपीएस यांनी आज बैठक घेतली.
यावेळी त्यांनी दक्षिण गोव्यातील गुन्हे आणि अपघात डेटा विश्लेषणाचा आढावा घेतला. यावेळी दक्षिण गोव्याचे एसपी, दक्षिण गोव्यातील सर्व डीवायएसपी आणि दक्षिण गोव्यातील विविध पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस निरीक्षक तसेच दक्षिण गोव्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक आणि निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीत अपघातांबाबत माहिती देण्यात आली. अपघात रोखण्यासाठी आम्ही धोरण आखले असल्याचे डीजीपी म्हणाले त्यांनी सर्व अधिकार्यांना मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे आणि सीट बेल्ट न लावणे यावर कठोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. नियमांचे पालन करण्यासाठी वाहनचालकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचेही डीजीपी म्हणाले.
तसेच त्यांना एटीएस पोलिसांच्या कथित खंडणी प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही. जर तक्रार आली तर निश्चितपणे चौकशी सुरू करून आवश्यक कारवाई केली जाईल.