जीसीए प्रीमियर लीग एक मार्चपासून
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला येत्या एक मार्चपासून सुरवात होईल. यंदा स्पर्धेत सहा संघांत चुरस असून करिमाबाद क्रिकेट क्लबच्या अनुपस्थितीत पणजी जिमखान्याने स्पर्धेत पुनरागमन केले.
गतविजेत्या जीनो स्पोर्टस क्लबने शुक्रवारी झालेल्या खेळाडू लिलावात रणजी पदार्पण आश्वासक ठरलेल्या ईशान गडेकर या डावखुऱ्या सलामीवीरावर विश्वास दाखविला. तो संघातील प्रमुख खेळाडू आहे.
स्पर्धेतील गतउपविजेत्या धेंपो क्रिकेट क्लबने अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिले. युवा दीप कसवणकर, सलामीचा मंथन खुटकर, अनुभवी लक्षय गर्ग, यष्टिरक्षक करण वसुदिया यांच्यामुळे या संघाची ताकद वाढली आहे.
साळगावकर क्रिकेट क्लबनेही संघात दर्जेदार खेळाडू घेतले असून दीपराज गावकर, विजेश प्रभुदेसाई, अमोघ देसाई, अमूल्य पांड्रेकर यांच्यासह यश कसवणकर व दिशांक मिस्कीन असा अनुभवी व युवा यांचा संगम साधला गेला. पणजी जिमखान्याची फलंदाजी स्नेहल कवठणकरमुळे बलवान झाली आहे.