भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी (ता.31) दिल्लीतील राज्यसभेत सभापतींसमोर राज्यसभा सदस्यत्वाच्या पदाची व गोपनीयतेची मराठीतून शपथ घेतली.
मराठीतून राज्यसभेत शपथ घेणारे ते पहिले गोमंतकीय खासदार आहेत. गोव्यातून त्यांची राज्यसभा खासदारपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेत गेलेल्या तानावडे यांनी सभागृहातून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
“एक अविस्मरणीय क्षण, ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, भारतीय जनता पार्टी संघटना कार्यकर्ता म्हणून माझ्या वाटचालीत अनेक वेळा कठोर परिस्थितीला सामोरी जावं लागलं, पण कधीच डगमगलो नाही, कारण माझ्या पाठिशी तुम्हां सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा व आशीर्वाद सदैैव ठाम होता.”
“एक एक पाऊल पुढे टाकताना, माझ्या वरिष्ठांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पाठिंबा आणि सहकार्य सदैव मिळाले , आणि तीच माझी खरी ताकद होती. कार्यकर्ता आणि हितचिंतकांकडून लाभलेल्या पाठींंबाचा मी सदैव ऋणी आहे.”
“ज्यांनी मला प्रेरणा दिली, प्रेरित केले आणि मला पक्षाच्या हितासाठी पुढे जाण्यास बळ दिले त्या सर्वांना हा दिवस समर्पित आहे. तुमचा पाठिंबा मला माझ्या नवीन कार्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. धन्यवाद” अशी पोस्ट सदानंद शेट तानावडे यांनी शेअर केली आहे.
हल्लीच काही दिवसांपूर्वी माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत संपल्याने राज्यसभेतील हे पद रिक्त झाले होते.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पंचायतीपासून ते खासदार होईपर्यंत राजकारणात विविध पदे भूषविली आहेत.