
Goa State Film Festival; वर्षा उसगावकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार
गोव्याच्या चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या १०व्या, ११व्या आणि १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा गुरुवार (१४ ऑगस्ट) भव्य शुभारंभ होणार आहे. पणजी येथील आयनॉक्स स्क्रीन १ येथे दुपारी ३:३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार तथा एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) च्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल.
यावर्षीचा महोत्सव खास आहे, कारण या निमित्ताने गोव्याची लोकप्रिय अभिनेत्री, गायिका वर्षा उसगावकर यांना अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना रविवार, १७ रोजी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यंदाचा चित्रपट महोत्सव ‘मोगचो आवंडो’ या गोव्याच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष रूपात साजरा होत आहे. या महोत्सवामध्ये २०१८ ते २०२३ या कालावधीतील निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत. माकिनेझ पॅलेस थिएटर आणि आयनॉक्स, पणजी येथे या चित्रपटांचे प्रदर्शन होईल. एकूण १९ कथापट (feature films) आणि ४ लघुपट (non-feature films) विविध पुरस्कारांसाठी चुरशीची स्पर्धा करतील.
या महोत्सवात एकूण २१ कथापट पुरस्कार आणि ७ लघुपट पुरस्कार दिले जातील. कोंकणी आणि मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत, तर लघुपटांसाठी एकच संयुक्त श्रेणी आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ५ लाख रुपयांचे पहिले पारितोषिक तर दुसऱ्या क्रमांकासाठी ३ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार, संगीत दिग्दर्शक अशा विविध श्रेणींमध्ये विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.